वारणावती : वारणा धरण (चांदोली) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण आता ५१.९८ टक्के भरले आहे. गेले २४ तासात चांदोली धरण परिसरामध्ये 146 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग सहाव्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवार ८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, धरणातील एकूण जलसाठा १७.८८ टीएमसी (५०६.३७ दशलक्ष घनमीटर) आह. उपयुक्त साठा ११.०० टीएमसी आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये धरण परिसर आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात १९,२१४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये धरणाच्या पाणीसाठ्यात १.६६ टीएमसीने वाढ झाली. सध्या धरणाची पाणीपातळी ६०७.४० मीटरवर पोहोचली आहे. यंदाच्या पावसात एकूण ६.६८ टीएमसी पाण्याची आवक धरणामध्ये झाली आहे. धरणातून सध्या नदी किंवा कालव्यात कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नाही. येत्या काही दिवसात पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.