सांगली : येथील स्वामी समर्थ घाटावर मंगळवारी सायंकाळी चैतन्य देवा तोरणे (वय २०) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून कुऱ्हाड आणि चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा खून शहरातील सराईत गुंड लखन इसरडे याच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात लखन इसरडेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात पाच संशयितांसह अन्य दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
लखन पंडित इसरडे, राकेश शामराव कांबळे, करण किशोर शिंदे, कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे आणि सुनील उर्फ मुक्या निलाप्पा (सर्व रा. संजय गांधी झोपडपट्टी, स्वस्तिक वे पुलाच्या पाठीमागे, भीमनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यांपैकी कृष्णा कांबळे याला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चैतन्य तोरणे हा वाढपी म्हणून काम करत होता. मंगळवारी सायंकाळी तो स्वामी समर्थ घाटावर गेला असता, आधीच पाळत ठेवून असलेले संशयित त्या ठिकाणी आले. त्यांनी जुना वाद उकरून काढत चैतन्यशी हुज्जत घातली. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी कुऱ्हाड आणि चाकूने चैतन्यच्या तोंडावर, पोटावर आणि डोक्यात सपासप वार केले. हे वर्मी वार लागल्याने चैतन्य रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कृष्णा कांबळे याला ताब्यात घेतले. उर्वरित फरार हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली.
मासे मारण्यासाठी आला असता हल्ला
चैतन्य तोरणे हा कृष्णा नदीच्या घाटावर मासेमारी करण्यासाठी आला होता. तो घाटावर एकटाच असल्याची माहिती संशयित हल्लेखोरांना मिळाली. त्याच्या पाळतीवर असलेले हल्लेखोर कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन घाटावर आले. तेथे चैतन्य एकटा सापडल्याची संधी साधून टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्याचा गेम केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि जुना वाद
यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये गोकुळनगर परिसरात विनोद किसन इंगळे (वय २८, रा. संजय गांधी झोपडपट्टी) याचा खून झाला होता. त्या गुन्ह्यातही लखन इसरडे, कृष्णा उर्फ मुदक्या कांबळे, राकेश कांबळे आणि नारायण पवार यांचा समावेश होता. विनोद इंगळे खुनाचा हाच जुना वाद पुन्हा टोकाला गेल्याने चैतन्यचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.