जत : मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यातील लकडेवाडी येथे घडली. खंडू श्रीमंत भिसे (वय 45) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी मुलगा पृथ्वीराज खंडू भिसे (वय 24) याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
भिसे कुटुंबात वडील खंडू आणि मुलगा पृथ्वीराज यांच्यात काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. पृथ्वीराज हा वडिलांकडे लग्न लावून देण्याचा तगादा लावत होता. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची चर्चा घटनास्थळी होती. किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पाच वर्षांपूर्वी हे कुटुंब मजुरीच्या निमित्ताने सांगली येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते लकडेवाडी येथे राहण्यासाठी आले होते. गुरुवारी सायंकाळी पृथ्वीराज घरी आल्यानंतर त्याने वडील खंडू यांच्याशी पुन्हा लग्नाच्या कारणावरून वाद घातला. दोघांतील वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात पृथ्वीराज याने दगडाने पित्याच्या डोक्यात वार केला. यात खंडू गंभीर जखमी झाले. उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.