आष्टा : वारंवार खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी रात्री महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकले. 
सांगली

Sangli News : आष्ट्यात महावितरणच्या कार्यालयाला टाळे

विजेच्या लंपडावाविरोधात नागरिक आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

आष्टा : आष्टा शहर आणि मळे भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या सातत्याच्या लपंडावाविरुद्ध अखेर नागरिकांचा जनक्षोभ उसळला. तीव्र उन्हाळा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या सुमारे 200 ते 300 नागरिकांनी मंगळवार, दि. 26 रोजी रात्री 11 वाजता महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकले. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मळे भागातील लोडशेडिंग तातडीने बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा वाढल्याने आष्ट्यातील नागरिक हैराण झाले आहेत. घरात पंखे, कुलर आणि एसीची गरज असताना दिवसा व रात्री तासन्‌‍ तास वीज गायब होत होती. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला बसत होता. नियमित वीजबिल भरूनही वीज का मिळत नाही, असा संतप्त सवाल नागरिक करत होते. या गंभीर समस्येवर ‌‘पुढारी‌’ने सातत्याने आवाज उठविला होता, तर नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनीही प्रशासनाला आंदोलनाचा थेट इशारा दिला होता. पण प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नगरसेवक विराज शिंदे, संजय सावंत, शकील मुजावर, प्रवीण माने, संदीप गायकवाड, पोपट शिंदे यांच्यासह मळे भागातील शेकडो नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला आणि कार्यालयाला कुलूप लावले.

या आंदोलनादरम्यान नगरसेवक विराज शिंदे यांनी आमदार जयंत पाटील यांना परिस्थितीची कल्पना दिली. आमदार जयंत पाटील यांनी तातडीने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापुढे मळे भागातील लोडशेडिंग तत्काळ बंद करण्यात येईल आणि तांत्रिक कारणाशिवाय वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे ठोस आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT