Sangli District Bank Pudhari File Photo
सांगली

Sangli News| जिल्हा सहकारी बँकेत नातलगबाजीचा कहर

‘घराणेशाही’ला ऊत : ताटात सांडलं काय अन वाटीत सांडलं काय...

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत शिंदे

​सांगली : वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील आणि राजारामबापू पाटील यांसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली, त्या बँकेच्या सत्तेची सूत्रे आता प्रस्थापित राजकीय घराणी आणि नातेवाईकांच्या हाती एकवटल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसचे महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे तानाजी पाटील यांची निवड झाल्याने, जिल्ह्याच्या सहकार व राजकारणातील ‘सगे-सोयरे’ आणि सत्तेच्या केंद्रीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या निवडीचे राजकीय व कौटुंबिक संदर्भ तपासले असता, जिल्ह्यातील महत्त्वाची सत्ताकेंद्रे ठराविक कुटुंबांच्या भोवतीच फिरत असल्याचे स्पष्ट होते. अध्यक्षपदी निवड झालेले महेंद्र लाड हे काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे भाऊजी आहेत, तर त्यांचे पुत्र सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवत आहेत. दुसरीकडे, उपाध्यक्षपदी विराजमान झालेले तानाजी पाटील यांचे पुत्रही जिल्हा परिषदेत सभापती आहेत.

निवडणुका टाळण्याच्या नावाखाली बिनविरोधचा प्रयोग?

जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची भीषणता वाढली असताना आणि शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी संघर्ष करत असताना, निवडणुकीचा खर्च टाळण्याच्या नावाखाली २१ पैकी १५ जागा बिनविरोध पदरात पाडून घेण्यात आल्या. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी सलग संचालक राहण्यावर निर्बंध आणले खरे; परंतु या नियमांना बगल देत नेत्यांनी स्वतःऐवजी आपल्या घरातील व्यक्तींना (मुलगा, पत्नी, भाऊ किंवा नातेवाईक) संचालक मंडळावर संधी देऊन सत्तेची खुर्ची आपल्याच घरात शाबूत राखल्याची टीका होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT