आता प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेतीचा फंडा 
सांगली

Sangli News : आता प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेतीचा फंडा

गावनिहाय गट; दर्जेदार उत्पादनासाठी शासन आग्रही; प्रयोगशीलतेला वाव

पुढारी वृत्तसेवा

विवेक दाभोळे

सांगली : राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार ‘सेंद्रिय शेती-विषमुक्त शेती’च्या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेती क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

‘सेंद्रिय शेती-विषमुक्त शेती’च्या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.

सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, ही प्रणाली सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने तयार करून इतरत्र प्रसारित करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेती मालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी उद्दिष्ट्ये या मिशनच्या माध्यमातून साध्य करण्यात येणार आहेत. याच मिशनच्या माध्यमातून स्थानिक ग्राहकांना विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध करण्याचा हा एक प्रयत्न मानला जात आहे.

या मिशनसाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सेंद्रिय शेतीसाठी राज्य पुरस्कृत स्वतंत्र योजना प्रस्तावित करण्यात येत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्याने जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन त्या मृतवत होत चालल्या आहेत. तसेच तणनाशके-कीटकनाशकांच्या अतिवापरामुळेही जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. या साऱ्यांचा परिणाम म्हणून उत्पादित शेतीमालात आरोग्यास अपायकारक अशा रासायनिक घटकांचे प्रमाण वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय वितरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांकडे वाढता कल आहे. परदेशातूनही अशाच फळपिकांना मागणी आहे. त्यातून सेंद्रिय शेतीची गरज भासू लागली आहे.

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. याकरिता दोन योजना राबवल्या जाणार आहेत. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत करून क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शेतीत उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर सातत्याने वाढत आहे.

त्याचप्रमाणे याअंतर्गत सेंद्रिय शेतकरी गट तयार करण्यात येत आहेत. यातील एक गट हा ५० हेक्टरचा असेल. प्रति शेतकरी जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तालुक्यात एका गावात शक्यतो सलग क्षेत्रात हा सेंद्रिय शेतकरी गट स्थापन करावयाचा आहे. या गटाची शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) माध्यमातून नोंदणी करावयाची आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे विषय आहेत. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि ३ वर्षांसाठी मदत करणार आहे. हेक्टरी ३१ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT