आष्टा : रोझावाडी (ता. वाळवा) येथे ऊसाच्या शेतात अचानक चक्कर येऊन पडल्याने पिंकी राजेश चव्हाण (वय १२, मूळ रा. महागाव, जि. यवतमाळ, सध्या रा. रोझावाडी) या बालिकेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी चव्हाण बुधवारी रोझावाडी येथील शहाबाज पिरजादे यांच्या ऊसाच्या शेतात नातेवाईकांसोबत होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक चक्कर आल्याने ती खाली पडली. तिचे मामा अजय राम राठोड यांनी तिला तातडीने उपचारासाठी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. घोंगडे यांनी दिलेल्या माहितीवरून आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.