नेवरी : नेवरी (ता. कडेगाव) येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची घरांची कुलूपे व कड्या तोडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना घडली. या एकाच रात्री घडलेल्या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत ग्रामस्थांनी नेवरी पोलिस दूरक्षेत्राकडे तक्रार दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
विटा-सातारा महामार्गालगत असलेल्या नेवरी गावातील गणेशनगर परिसरातील विशाल युवराज महाडिक यांच्या बंगल्याचा दरवाजा कटावणीने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घराच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी ६०० ग्रॅम चांदी, पाच तोळे सोन्याचे अलंकार आणि रोख १३ हजार ६०० रुपये असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, खोलीमध्ये केमिकलचा उग्र वास येत असल्याने चोरट्यांनी गुंगीचा किंवा हुंगण्याचा स्प्रे वापरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरातील युवराज महाडिक यांना पहाटे तीन वाजता जाग आल्यावर सोन्या-चांदीच्या डब्या खाली पडलेल्या पाहून चोरीचा प्रकार उघडकीस आला.
याच रात्री नजीकच असलेल्या डॉ. अमोल लक्ष्मण महाडिक यांच्या 'श्री स्वामी समर्थ क्लिनिक'चे कुलूप तोडून ४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. तसेच डॉ. महाडिक यांच्या घराचा दरवाजा कटावणीने उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न उघडल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. याशिवाय नजीकच राहणारे भिकारी तुकाराम महाडिक यांच्या घरामध्येही चोरीचा प्रयत्न झाला; मात्र दरवाजा उघडता न आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चोऱ्यांमध्ये चोरटे एकापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.