नेर्ले : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी रात्री नेर्ले (ता. वाळवा) येथे आशियाई महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आग लावण्यात आली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाने कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखर कारखाने सुरू झाल्यापासून कारखानदार समर्थक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वारंवार खडाजंगी होत आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखून धरून आंदोलन सुरू केले असून, कारखान्यांनी तातडीने अधिकृत दरपत्रक जाहीर करावे, अशी मागणी लावून धरली आहे. गुरुवारी रात्री नेर्लेकडून कृष्णा कारखान्याच्या दिशेने उसाने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ ईपी ४०८७) निघाला होता. यादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून पाठलाग करून हा ट्रॅक्टर अडवला आणि पेटवून दिला, तसेच जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते तिथून निघून गेले.
याप्रकरणी ट्रॅक्टरचालक विलास कैलास पाटील (वय ३४, सध्या रा. पेठनाका, अदिती ज्यूस फॅक्टरी, मूळ रा. टिटवी, ता. पारोडा, जि. जळगाव) यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री दोन ट्रॉल्यांमध्ये ऊस भरून कृष्णा कारखान्याकडे जात असताना, नेर्ले नवीन ब्रीजजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी ट्रॅक्टरसमोर गाड्या आडव्या घालून तो थांबवला. चालकाला खाली उतरवून, ‘ऊस कारखान्याला का घेऊन जात आहेस?’ असे म्हणून दमदाटी केली आणि ट्रॅक्टरच्या हुडाला व कापडी वस्तूंना आग लावली. या घटनेत ट्रॅक्टरचे अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.