कुपवाड : कुपवाड शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. कुपवाड, मिरज आणि सांगली या तीन औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करणार्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाकडे जाणार्या वाहनांची संख्याही जास्त आहे. त्याचबरोबर मुख्य चौकाजवळ सात शाळा, महाविद्यालय असल्याने सोसायटी चौकात दररोज वाहनांची कोंडी होते. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
शहरालगत कुपवाड, बामणोली, मिरज, सांगली, संजयनगर तसेच शेजारील सावळी, कानडवाडी, तानंग, मानमोडी या ग्रामीण भागातही औद्योगिक वसाहत वाढत आहे. सांगलीतून मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, पंढरपूरकडे ये-जा करणारी वाहने कुपवाड शहरातून जातात. तसेच नागपूर, रत्नागिरी महामार्गाकडे ये-जा करणारी वाहनेही कुपवाड शहरातूनच जातात. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. विजयनगर येथे नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, न्यायालय असल्याने कुपवाड शेजारील बुधगाव, कवलापूर, सावळी, तानंग, कानडवाडी, मानमोडी, कांचनपूर, कळंबी, भोसे, सोनी आदी गावांसह तासगाव, विटा, खानापूर, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांतील शेतकरी, ग्रामस्थ, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक कुपवाड शहरातून ये-जा करीत असतात.
शहरातील सोसायटी चौकातील मुख्य रस्त्यालगत जिल्हा परिषद प्राथमिक मुला-मुलींची शाळा, ऊर्दू शाळा, आर. पी. पाटील विद्यालय, आशालता उपाध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनाबाई पाटील मुलींची शाळा, हजरत लाडले मशायक शिक्षण संस्था, अशा सात शाळा, हायस्कूल, महाविद्यालय आहेत. यामध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय वालचंद, विलिंग्डन महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ये-जा करणार्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.
आर. पी. पाटील मुख्य चौकात रस्त्यावर आठवडा बाजार, तसेच हजरत लाडले मशायक दर्ग्यासमोर आठवडा बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी शेजारील शेतकरी, व्यापारी तसेच इतर विविध व्यापारी, व्यावसायिक येतात. बाजारामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. माजी न्यायमूर्ती सी. टी. पाटील यांचे घर ते बामणोली रस्त्यापर्यंत उत्तर बाजूला पदपथ आहे. हा पदपथ नावालाच आहे. अनेक व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे पदपथ लहान झालेला आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूला काही ठिकाणी पदपथच नाही. वाहने रस्त्यावर उभी केलेली असतात. आमदार, खासदार यांनी याकडे लक्ष देऊन उड्डाणपूल उभारण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.