ईश्वरपूर : वाघवाडी (ता. वाळवा) येथील शकुंतलानगर परिसरातील एन. डी. पाटील शुगर कारखान्याच्या बगॅस डेपोला सोमवार, दि. २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डेपोतील बगॅस पूर्णतः जळून खाक झाला. आगीत अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बगॅस डेपोतून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. हा प्रकार लक्षात घेताच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
माहिती मिळताच ईश्वरपूर नगरपालिकेचे अग्निशमन पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ शिराळा नगरपालिका आणि विश्वास कारखान्याची अग्निशमन पथकेही घटनास्थळी पोहोचली. तीन अग्निशामक वाहने आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
अग्निशामक दलांनी तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीच्या भीषण तीव्रतेमुळे डेपोतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. तपासणीनंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.