सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : राष्ट्रवादीच्या दोघांवर अपात्रतेची तलवार

व्हीप डावलून मतदान; एक एप्रिलच्या सभापती निवडीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी पक्षाच्या व्हीपकडे दुर्लक्ष करत भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे दोन सदस्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. करगणी (ता. आटपाडी) गटाचे विनायक मासाळ आणि मणेराजुरी (ता. तासगाव) गटाचे शशिकांत जमदाडे यांच्यावर पक्षविरोधी कारवाईची शक्यता निर्माण झाली असून त्यांच्या अपात्रतेबाबतची चर्चा सुरू आहे.

फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. सत्तास्थापनेसाठी 31 सदस्यांची गरज असताना महाविकास आघाडी 30 जागांवर थांबली होती. दुसरीकडे महायुतीचे संख्याबळ 31 असले तरी घटक पक्ष वेगवेगळे लढल्याने त्यांची एकत्रित भूमिका स्पष्ट नव्हती. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांना आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप गटनेत्या राजेश्वरी नाईक यांनी दिला होता. त्यापैकी चार सदस्यांनी व्हीपचे पालन केले, तर मासाळ आणि जमदाडे यांनी तो नाकारत वेगळी भूमिका घेतली.

अध्यक्ष निवडीत त्यांनी भाजपला, तर उपाध्यक्ष निवडीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. या कृतीमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 1 एप्रिलरोजी विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. या निवडीत मासाळ आणि जमदाडे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी पुन्हा पक्षविरोधी भूमिका घेतल्यास संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT