सांगली ःजिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत आमच्या पक्षाला कोणी अध्यक्षपद देईल, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, ही मागणी आजही कायम आहे. कोणाचा जरी आदेश आला तरी, पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय जिल्ह्यातील नेते घेतील, अशी भूमिका राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मांडली. तसेच पालकमंत्र्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, असा टोलाही माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आ. विलासराव जगताप यांनी यावेळी लगावला.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांची सोमवारी गटनोंदणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, तम्मणगौडा रवी-पाटील, रणधीर नाईक उपस्थित होते.
‘व्हीप’चा कायदा सांगणारे मऊ का झाले ः माजी मंत्री अजितराव घोरपडे
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, सत्तास्थापनेत अध्यक्ष पद मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, म्हणून पालकमंत्री काही बोलले असतील. मात्र ‘व्हीप’चा कायदा सांगणारे आता मऊ झाले आहेत, ते का बरं मऊ झाले, हे समजून घ्या, असा टोलाही त्यांनी पालकमंत्र्यांना लगावला.
सल्ल्याची गरज नाही, आयुष्य राजकारणात घालवलंय ः जगताप
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘व्हीप’च्याबाबतीत पक्षाकडून कोणताच गोंधळ झाला नाही, तो प्रशासनाकडून झाला. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादीवर बोलण्याचा अधिकार काय? आमच्या पक्षात सक्षम लोक आहेत. त्यांनी सल्ला देण्यासारखी परिस्थिती नाही. भाजपाचे 16 सदस्य निवडून आले आहेत. सत्तास्थापनेसाठी 31 सदस्यांची गरज आहे. त्यामुळे इतर सदस्य भाजप कोठून आणणार? ‘व्हीप’चा कायदा आम्हाला कळतो. पालकमंत्र्यांपेक्षा जास्त आयुष्य आम्ही राजकारणात घालवले आहे. भाजपाचे जुने सहकारी होतो, तेव्हा पाडायची कामे यांनीच केली.