सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : भाजपच्या दारात राष्ट्रवादी (श.प.) पोहोचवली कोणी ?

महापौर निवडीवेळी तीन फेटे का नाही खटकले ? ः स्थानिक नेत्याची मतलबी चाल

पुढारी वृत्तसेवा

उध्दव पाटील

सांगली : महापौर-उपमहापौर निवडीच्या दिवशी महापालिकेत घडलेले एक दृश्य आता पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तीनही नगरसेवक भाजपच्या बैठकीला एका हॉटेलमध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर फेट्याला तुरा खोचून महापालिकेत दाखल झाले होते. त्या वेळी हे दृश्य अनेकांच्या नजरेत भरले, काहींना खटकलेही; पण त्याकडे फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र आता त्याच तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक पक्षाला रामराम करत थेट भाजपच्या नावेत जाऊन बसले आहेत. आज प्रश्न केवळ पक्षांतराचा नाही. प्रश्न आहे, त्या दिवशी भाजपच्या बैठकीला हे तीन नगरसेवक गेले कसे? त्यांना भाजपच्या दारात पोहोचवले कोणी?

महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात सर्व पक्ष लढले. काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची अधिकृत आघाडी झाली होती. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी छुपा समझोता केला होता. एकमेकांना जागा सोडत समन्वय साधून निवडणूक लढवली होती. ते ओपन सिक्रेट होते. ते मतदारांनाही माहिती होते. शिवसेना आणि शिवसेना उबाठा हे पक्षही स्वतंत्रपणे लढले. मतदारांनीही या सर्व चौकटीत मतदान केले. मतमोजणी झाली. सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. मग गुळाला मुंगळा जसा चिकटतो, तसे लगेचच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष सत्तेला जाऊन चिकटला.

राजकारणात सर्व काही माफ असते, असे म्हटले जाते. तडजोडी होतात, पडद्यामागे चर्चा होतात. पण महापौर, उपमहापौर निवडीच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तीनही नगरसेवकांनी थेट भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणे हे राजकीय शिष्टाचाराच्या चौकटीत बसणारे नव्हते. महापालिका निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री जयंत पाटील यांच्यातच प्रामुख्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. नटसम्राट नाटकातील बेलवलकर आणि पिंजऱ्यातील मास्तर, अशा उपमा देऊन टीका-टिप्पणी झाली होती. अशा परिस्थितीत महापौर निवडीच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तीनही नगरसेवकांनी भाजपच्या बैठकीला जाणे, फेटा बांधून त्याचा तुरा काढून ऐटीत महापालिकेत येणे खटकणारे होते. निवडीनंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तीनही नगरसेवक भाजप नगरसेवकांच्याही पुढे होते. स्पष्ट आणि थेटच सांगायचे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला हे तीन नगरसेवक आणि डाव्या बाजूला नूतन महापौर धीरज सूर्यवंशी होते. आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेसला सोडून हे तीन नगरसेवक भाजपच्या घोळक्याचाच एक भाग झाले होते.

.. हे धाडस पक्ष नेतृत्व करेल काय?

भाजपच्या बैठकीला जाणे, फेट्याला तुरा खोचून महापालिकेत येणे आणि सोशल माध्यमात पोस्ट लिहून महायुतीचे सूर्यवंशी, मगदूम यांना जाहीर पाठिंबा देणे, हे धाडस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन नगरसेवकांनी स्वत:हून केले होते, की त्यामागे पक्षातून कोणीतरी आदेश दिला होता? कारण कोणत्याही पक्षाचे नगरसेवक हे विरोधी पक्षाच्या बैठकीला अचानक जाऊन बसत नाहीत. विशेषतः महापौर-उपमहापौर निवडीसारख्या संवेदनशील राजकीय क्षणी तर नाहीच नाही. म्हणजेच त्यावेळी पक्षातील कुणीतरी जबाबदार पदाधिकाऱ्याने हे सर्व मूक संमतीने घडू दिले होते का, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे पुढे येतो. आता पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांवर टीका करून आणि त्यांच्याविरोधात कारवाईच्या हालचाली करून उपयोग काय? तीनही नगरसेवकांना भाजपच्या दारात कोणी पोहोचवले, हे शोधण्याचे आणि त्यांना खडे बोल सुनावण्याचे धाडस पक्ष नेतृत्व करणार आहे का? भाजपमध्ये गेलेले दोषी की त्यांना भाजपची वाट दाखवणारे दोषी, यावर आता चर्चा व्हायला पाहिजे. आपल्या मतलबी चालीसाठी पक्षनिष्ठा ढासळते तेव्हा केवळ जाणाऱ्यांची चूक असते का, हाही प्रश्न उपस्थित होतो.

पक्षाची ती भूमिका होती का?

महापालिकेत भाजप 39, काँग्रेस 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 आणि शिवसेना 2 असे संख्याबळ होते. भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. पण जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. भाजपला हा पराभव जिव्हारी लागला. अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील भाजपच्या निशाण्यावर आले. भाजपने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता आणि एक नगरसेवक फोडून त्यांना भाजपमध्ये घेतले आहे. हा थेट जयंतरावांना धक्का मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT