सांगली; पुढारी वृत्तसेवा : पृथ्वीराज पवार यांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची कावीळ झाली आहे. जनता ते ओळखून आहे. शेरीनाल्यावर चारटर्म राजकारण करणार्यांनी काय उजेड पाडला, हेही जनता ओळखून आहे, अशी टीका महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रा. जगदाळे म्हणाले, नदीप्रदूषणामुळे मासे मृत्युमुखी पडले. पिण्याचे पाणीही दूषित झाले. नदी प्रदूषण व नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 62 कोटी रुपये निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. या बाबींकडे न पाहता जयंत पाटील विरोधाने पछाडल्याने पृथ्वीराज पवार बेताल टीका करत आहेत. कोणत्या कारखान्याच्या सांडपाण्याने नदीचे प्रदूषण झाले, याबाबत कोर्टात निकाल लागेल. पवार यांनी न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करून नये.
जगदाळे म्हणाले, पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर आरोप करून स्वप्नपूर्ती डिस्टिलरीची वकिली केली आहे. स्वप्नपूर्तीच्या पाण्यामुळे नदी प्रदूषण झाले, हे स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन न करता पवार यांनी जयंत पाटील यांनाच टार्गेट केले आहे.
महापौर सूर्यवंशी म्हणाले, शेरीनाल्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर स्थानिक आमदारांनी विधानसभेत बोलणे अपेक्षित होते. मात्र सांगलीकर नागरिकांच्या काळजीपोटी जयंत पाटील यांनी विषय उपस्थित केला. त्यामुळे शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला 62 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शेरीनाल्यावर चार टर्म राजकारण करणार्यांनी आजपर्यंत काय उजेड पाडला? जयंत पाटील यांच्यामुळे आता 62 कोटी रुपये मिळत आहेत. शेरीनाल्याचा प्रश्नच संपणार आहे. जयंत पाटील यांनी तीस वर्षांच्या सत्ताकाळात काय केले, असा प्रश्न पृथ्वीराज पवार हे विचारत आहेत. पण या सत्ताकाळात जयंत पाटील आणि माजी आमदार (स्व.) संभाजी पवार, पृथ्वीराज पवार यांचे राजकीय संबंध काय होते, हे सर्वांना माहिती आहे. दादा-बापू वादात स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम पृथ्वीराज पवार करत आहेत, अशी टीका जगदाळे यांनी केली.