सांगली ः सांगली, मिरज व कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच, या युतीविरोधात पुणे महापालिकेप्रमाणे महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांचाही पक्ष एकत्र येणार, अशी चर्चा बुधवारी जोरदार रंगली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, संपर्क प्रमुख शेखर माने यांच्यात जागा वाटपाबाबत रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू झाली आहे. मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने दोन माजी महापौरांसह 15 नगरसेवकांचा पक्षप्रवेश घेऊन तयारीचा धडाका लावला आहे. दुसर्या बाजूला भाजपचीही जोरदार तयारी सुरू आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबरोबर चर्चा सुरू ठेवली आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबरोबर भाजपची अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र बुधवारी महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्षही एकत्रित येऊन निवडणूक लढविणार, अशी चर्चा सुरू झाली. त्याला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनीही दुजोरा दिला, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबाबत दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे नेमके काय होणार, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांची जागा वाटपासंदर्भात रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. कोणत्या प्रभागात कुणाची ताकद किती आहे, कोण निवडून येऊ शकतो, विरोधात कोणता उमेदवार असेल, याची चाचपणी करण्यात येत होती.
इच्छुकांमध्ये धाकधूक
महापालिका निवडणुकीसाठी कोणते पक्ष एकत्रित येतील, निवडणूक दुरंगी की तिरंगी? याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक आहे. अनेक उमेदवार दोन-तीन पक्षांच्या संपर्कात आहेत. काही उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळणारच, हे गृहित धरून प्रचारही सुरू केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न
महापालिका निवडणुकीसाठी मिरज शहरातील प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष सध्या मजबूत दिसत आहे. या ठिकाणचे इच्छुक स्वतंत्र निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त करीत आहेत. दुसर्या बाजूला सांगली शहरातील इच्छुक महायुती करावी, या मताचे आहेत. त्यातच महायुतीसाठी भाजपने अद्याप कोणतीही चर्चा केली नसल्याने ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर जाणार, अशी चर्चा सुरू केली असावी, असेही बोलले जात आहे.