सांगली : शारदीय नवरात्रौत्सवाला काल, सोमवारपासून उत्साहात आणि भक्तिभावात प्रारंभ झाला. घरोघरी घटस्थापना करण्यात आली. शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनीही देवीची भक्तिभावात प्रतिष्ठापना केली. काही मंडळांनी मूर्तीची स्वागत मिरवणूक काढली. दरम्यान, काल पहाटेपासून देवीच्या मंदिरांमधून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी सुरू झाली.
शारदीय नवरात्रौत्सव काल, सोमवारपासून सुरू झाला आणि गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले. हा उत्साह आता 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यावर्षी तृतीया तिथी दोन दिवस विभागल्यामुळे हा 10 दिवसांचा नवरात्र योग जुळून आला आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. सांगलीसह प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीची धांदल उडाली आहे. देवीच्या भक्तांचे उपवासही सुरू झाले आहेत. त्यामुळे फळांना, उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे.