नागज : विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील नागज घाटात चोरट्यांनी रायवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील एका जोडप्याला अडवून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या जबरी चोरीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
रायवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील रघुनाथ बिरू खरात (वय 50) आणि त्यांच्या पत्नी शांताबाई हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच 42 एन 9753) रायवाडीच्या दिशेने निघाले होते. रायवाडी हद्दीतील नागज घाटात दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. चोरट्यांनी या दांपत्याला काठीने मारहाण सुरू केली. यामध्ये रघुनाथ आणि शांताबाई हे दोघेही जखमी झाले आहेत. मारहाण करून चोरट्यांनी शांताबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. घाटातील या चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.