मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे जानराववाडी रस्त्यावर एका मूकबधिर, मतिमंद तरुणाचे डोके दगडावर आपटून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. उमेश पांडुरंग कांबळे (वय 40, रा. बेळंकी) असे मृताचे नाव आहे. सलग दुसर्या दिवशी तालुक्यात खुनाची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, बेळंकी ते जानराववाडी रस्त्यावर रेल्वे पुलानजीक रविवारी सकाळी उमेश या मूकबधिर व मतिमंद तरुणाचा मृतदेह रस्त्याकडेला पडल्याचे निदर्शनास आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याचे दगडावर डोके आपटून त्याचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची शक्यता आहे. तो नेहमी गावात फिरत असेे. शनिवारी रात्री तो घरी परतला नाही. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बेळंकीचे पोलिस पाटील चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानपथक घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. मिरज ग्रामीण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे.
उमेश कांबळे याचा खून कोणी केला, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ऊसतोड मजूर अथवा बिहारी तरुणांनी हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना केली आहेत.