सांगली : शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मीकी आवास येथे गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. भरदिवसा दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. सौरभ बापू कांबळे (वय 24, रा. वाल्मीकी आवास) असे मृताचे नाव आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. खुनातील संशयितांची नावेही स्पष्ट झाली असून मुख्य संशयित सराईत गुन्हेगार आहे. अन्य संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
सौरभ कांबळे हा वाल्मिकी आवास परिसरात भावासोबत राहत होता. त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे दाखल आहेत. संशयित हल्लेखोर आणि सौरभ यांच्यात आठ दिवसापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग संशयितांच्या मनात होता. शनिवारी दुपारी सौरभ व त्याचे मित्र वाल्मिकी आवासमध्ये थांबले होते. यावेळी मागील बाजूच्या शेतातून संशयित हल्लेखोर त्याच्या दिशेने आले. हल्लेखोर येत असल्याचे पाहून सौरभ याने मित्रांना बाजूला पाठविले. त्याचे मित्र जाताच संशयितांची सौरभ याच्याशी वादावादी झाली. त्यानंतर सौरभ तेथून बिल्डिंग क्रमांक सात येथे पळत आला. संशयितांनी त्याला गाठून कोयता आणि दगडाने मारहाण केली. कोयत्याचा वार गळ्यावर वर्मी बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
वाल्मिकी आवासमध्ये खून झाल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेतली. उपअधीक्षक विमला एम., शहरचे निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. संशयित हल्लेखोरांची नावे समोर आली असून पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.