Murder Case Pudhari
सांगली

Sangli Murder Case: सांगलीत पाठलाग करून गुन्हेगाराचा खून

नशेच्या अड्ड्यावरच हल्ला; एका संशयितास अटक, एक फरार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ सौरभ महादेव पवार (वय 22, रा. राजीवनगर, कुपवाड रस्ता, सांगली) या तरुणाचा दोघांनी पाठलाग करून निर्घृण खून केला. नशेखोरांचा अड्डा बनलेल्या या ठिकाणी हा प्रकार सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.

दरम्यान, संशयित शाहीद समीर मुल्ला व आयान समीर भिस्ती (दोघे रा. राजीवनगर) या दोघांनी हा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहीद मुल्ला याला पोलिसांनी पकडले, तर आयान पसार झाला आहे. मृत सौरभ हा घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित असून हल्लेखोर दोघे दुचाकी चोरीतील संशयित आहेत. नशेखोरांचा अड्डा बनलेल्या ठिकाणीच खून झाल्याने सांगली शहरातील नशेखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सौरभ हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. राजीवनगर येथे तो आई-वडिलांसह राहत होता. सध्या तो फरशी फिटिंगचे काम करत होता. संशयित शाहीद मुल्ला व आयान भिस्ती हेदेखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिघेही नशा करत होते. कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गाळ्यामागे नशेखोरांच्या अड्ड्यावर ते भेटत असत. काही दिवसापूर्वी सौरभ आणि दोघा संशयितांमध्ये वाद होऊन मारामारी झाली होती.

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास मृत सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार पाथरवट हे दोघे दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आले. तेव्हा संशयित दोघे दुचाकीजवळ आले. ‌‘दुचाकी नवीन घेतलास काय?‌’ असे म्हणत त्यांनी धारदार शस्त्राने थेट सौरभच्या गळ्यावरच वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ सावध होऊन दुचाकी टाकून पळाला. तेव्हा दोघांनी त्याचा पाठलाग केला. एका गाळ्यासमोर त्याला गाठून एडका व चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी सौरभच्या पाठीवर, पोटावर, मानेवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत सौरभ जिवाच्या आकांताने हल्ल्याच्या ठिकाणापासून मागील बाजूस असलेल्या राजीवनगर येथील आपल्या घराकडे पळाला. घराजवळ गेल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात आणले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गाळेधारकांनी पटापट आपली दुकाने बंद केली. हल्ल्यानंतर शस्त्र घेऊन पळणाऱ्या दोघांपैकी शाहीदला एका पोलिस कर्मचाऱ्याने पकडले, तर आयान भिस्ती पळून जाण्यात यशस्वी झाला. संजयनगर पोलिसांना कळवून शाहीदला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. खुनाची माहिती मिळताच संजयनगरचे पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आयानला पकडण्यासाठी पथक रवाना केले. पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत यांनीही घटनास्थळी भेट देऊन संजयनगर पोलिसांना सूचना केल्या.

डार्क स्पॉटवर वाढते गुन्हे

जुन्या कुपवाड रस्त्यावरील नशेखोरांचा अड्डा डार्क स्पॉट म्हणून ओळखला जात आहे. काही दिवसापूर्वी महापालिकेच्या गाळ्यामागील नशेखोरांच्या अड्ड्यावर एका तरुणावर खुनीहल्ला झाला होता. त्यानंतर त्याच ठिकाणी सोमवारी एका गुन्हेगाराचा खून झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT