सांगली : महानगरपालिका हद्दीतील तसेच शहरालगतचे एकूण 36 रस्ते विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली क्रेडाई सांगलीच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या प्राथमिक बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली.
महानगरपालिकेच्या विकास योजनेतील (डीपी प्लॅन) 32 रस्ते आणि महानगरपालिका हद्दीबाहेरील चार प्रमुख मार्गाचा विकास या योजनेतून होणार आहे. यासाठी आवश्यक सर्वेक्षण व डीपीआर खासगी यंत्रणेमार्फत तयार करण्याचे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्याचे क्रेडाई पदाधिकार्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी, पूरस्थितीचा विचार, शहरातील वाढती लोकसंख्या, कृष्णा नदीच्या पूरस्थितीत सुरक्षित वाहतुकीचा पर्याय, तसेच नव्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अॅप्रोच रस्ते, फ्लायओव्हर, पादचारी पूल, रेल्वे उड्डाण पूल, नदीवरील नवीन पूल आदी पायाभूत सुविधांची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.याशिवाय सांगली एसटी आगाराच्या वर्कशॉपचे माधवनगरजवळच्या नियोजित जागेत स्थलांतर, सांगली-मिरज-विश्रामबाग रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते, पार्किंग व पादचारी मार्गांचे नियोजन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महापालिकेच्या मुख्यालयाची नवी इमारत उभारणीचे प्रस्ताव मांडण्यात आले.
काही विकासकामे जिल्हा नियोजन मंडळ, आमदार, खासदार निधी, नगरोत्थान योजना, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून करण्याचे नियोजन आहे. या कामांवर जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संस्थांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करण्याचे आयुक्त गांधी यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. इद्रिस नायकवडी, समित कदम आदींच्या माध्यमातून हा आराखडा पूर्णत्वास नेण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
नागरिकांवर टोल न बसता हा विकास आराखडा राबविण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करणार आहे, अशी माहितीही क्रेडाईच्या पदाधिकार्यांनी दिली. या बैठकीस क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर, उपाध्यक्ष आनंदराव माळी, सचिव दिलीप पाटील, उत्तम आरगे, संचालक राजेश कुलकर्णी, संतोष अष्टेकर, शैलेश पवार, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जयराज सगरे, रवींद्र खिलारे, हणमंत पवार, धवल शहा, शीतल पाटील, महेश जामदार, इम्रान मुल्ला उपस्थित होते.