सांगली : 30 जूनअखेर घरपट्टी (मालमत्ता कर) वसुली 34 कोटींपर्यंत पोहोचली आहे. सांगलीतून 21.32 कोटी, मिरजेतून 6.66 कोटी, तर कुपवाडमधून 5.55 कोटी रुपये वसूल झाले आहेत. ही आकडेवारी 30 जूनरोजी रात्री पावणेनऊ वाजेपर्यंतची आहे. दरम्यान, 30 जूनपर्यंत घरपट्टीची संपूर्ण करून आगाऊ भरून 49 हजारावर नागरिकांनी सामान्य करात 10 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे, अशी माहिती मालमत्ता कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांनी दिली.
मुल्ला म्हणाले, महापालिका क्षेत्रात एकूण 1.60 लाख मालत्ताधारक आहेत. घरपट्टीची 2025-26 ची रक्कम आगाऊ भरण्यासंदर्भात महापालिकेने मालमत्ताधारकांना बिले दिलेली आहेत. मालमत्ताधारकांनी 30 जून 2025 अखेर मालमत्ताकराचा संपूर्ण भरणा एकरकमी करणार्यांना सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात आली. घरपट्टीची रक्कम रोखीने, धनादेश व ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सोय महापालिकेने केली होती. 1 एप्रिल ते 30 जून 2025 या कालावधीत 49 हजाराहून अधिक मालमत्ताधारकांनी घरपट्टीची संपूर्ण रक्कम भरली आहे. 30 जूनरोजी सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत 32.20 कोटी रुपये महापालिकेकडे जमा झाले आहेत. 49 हजारावर मालमत्ताधारकांनी घरपट्टीची रक्कम आगाऊ भरून सामान्य करात 10 टक्के सवलतीचा लाभ घेतला. सवलत मिळालेली एकूण रक्कम 96.91 लाख रुपये आहे.
घरपट्टीची रक्कम ऑनलाईन भरण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याला मालमत्ताधारकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 30 जूनरोजी रात्री 12 वाजेपर्यंत रक्कम भरणार्या मालमत्ता धारकांना 10 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण वसूल रकमेचा आकडा 32.20 कोटींहून अधिक असणार आहे. सांगलीतील मालमत्ता धारकांकडून घरपट्टीच्या चालू मागणीचे 17.99 कोटी व थकीत 2.91 कोटी रुपये, असे एकूण 20.90 कोटी रुपये वसूल झाले. मिरजेतून चालू मागणीचे 5.38 कोटी व थकीत 1.28 कोटी रुपये, असे एकूण 6.66 कोटी रुपये वसूल झाले. कुपवाडमधून चालू मागणीचे 3.67 कोटी व थकीत 0.96 कोटी रुपये, असे एकूण 4.63 कोटी रुपये वसूल झाले. घरपट्टीची रक्कम भरण्यात सांगली आघाडीवर राहिली आहे.