सांगली : महापालिका क्षेत्रात नळजोडणी धारकांचे बंद पाणी मीटर बदलून नवीन पाणी मीटर बसवले जात आहेत. मात्र या पाणी मीटरचा दर्जा, गुणवत्तेचा अहवाल स्थायी समितीला सादर होईपर्यंत संबंधित ठेकेदाराच्या बिलाची नोंदणी करू नये, ठेकेदाराचे बिल रोखावे, असे आदेश स्थायी समिती सभेने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील काही मोठी अपार्टमेंट, हॉटेल्स, मंगल कार्यालयांकडून महापालिकेचे अतिरिक्त पाणी वापरले जाते. त्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करावा व अतिरिक्त पाणी वापराबद्दल अतिरिक्त पाणीबिल आकारावे, असे निर्देश देण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्रातील गळती रोखणे व अन्य दुरुस्तीसंदर्भात पंधरा दिवसात कमी मुदतीची निविदा प्रक्रिया राबवा, असे आदेशही सभापती अतुल माने यांनी दिले.
महापालिकेत सोमवारी स्थायी समिती
सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. सदस्य मैनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, सुरेश बंडगर, उदय बेलवलकर, गणेश माळी, मोहन वाटवे, स्वाती शिंदे, कीर्ती देशमुख, मालुश्री खोत, दीपाली पाटील, स्मिता यमगर, बबिता मेंढे तसेच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील, पराग कोडगुले, विद्या पाटील तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.
गुणवत्ता अहवाल मिळेपर्यंत बिल रोखणार
महापालिका क्षेत्रात १२ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे दहा हजार मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरच्या गुणवत्तेबाबतचा तपासणी अहवाल बंगळुरू येथून प्राप्त झाला आहे. हा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करावा. तोपर्यंत पाणी मीटर पुरवठादाराचे बिल रेकॉर्ड करू नये, अशा स्पष्ट सूचना सभापती माने यांनी दिल्या.
पाणी पुरवठा यंत्रणेच्या दुरवस्थेवरून संताप
महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सदस्यांनी जलशुद्धीकरण केंद्रातील पाईपलाईन गंजलेल्या असून, ठिकठिकाणी गळती होत असल्याकडे लक्ष वेधले. संपवेलच्या भिंतींनाही पाझर लागला आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होत असून, संपूर्ण यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यावर सभापती माने यांनी, दुरुस्ती कार्यवाहीसाठी तातडीने कमी मुदतीची निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश दिले. तसेच पाणीपुरवठा विभागात आवश्यक कामगारांची भरती करण्याबाबतही सूचना केल्या.
३ कोटींच्या कामांचा अहवाल मागवला
सुजल निर्मल योजनेअंतर्गत तीन कोटी रुपये खर्च करून झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्याचे निर्देश सभापती अतुल माने यांनी दिले.
अपार्टमेंट, हॉटेल्सचा पाणी वापर तपासा
मोठे अपार्टमेंट, मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि लॉजिंगमध्ये भूमिगत टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे परिसरातील अन्य नळजोडणी धारकांना कमी दाबाने किंवा अपुरे पाणी मिळत असल्याची बाब सदस्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर मोठ्या आस्थापनांच्या पाणी वापराचा अहवाल तयार करावा. आवश्यकतेनुसारच पाणी वापर होईल याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त पाणी वापर होत असल्यास नियमानुसार जादा आकारणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले.
नवीन कूपनलिकांसाठी तरतूद करा
पाणीटंचाई आणि पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील बंद बोअरवेल दुरुस्त कराव्यात. तसेच महापालिकेच्या जागेत आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल (कूपनलिका) घेण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही सभापती माने यांनी सांगितले.