सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विभागांकडील सुमारे 14 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, आरोग्य विभागासाठी साहित्य खरेदी, जलनि:सारण, सार्वजनिक सोयीसुविधा कामांच्या निविदांना दरमान्यतेचे विषय सभेपुढे होते. महापालिकेकडील मानधनी कर्मचार्यांना मुदतवाढ देण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.
महापालिकेत सोमवारी प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख उपस्थित होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, गटार, सांस्कृतिक इमारत आदी कामांच्या निविदांना दरमान्यतेचा विषय स्थायी समिती सभेपुढे होता. त्यास मंजुरी देण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे चौकापर्यंत पेव्हिंग ब्लॉक फूटपाथ करण्याच्या 34 लाखांच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. कमी दराच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. पोरेज टीव्हीएस शोरूम ते शासकीय विश्रामगृहापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हिंग ब्लॉक रस्ता फूटपाथ करण्याच्या 36 लाखांच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. कमी दराच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागासाठी नवीन दहा ट्रॉलीमाऊंटेड दहा सीटर टॉयलेट युनिट खरेदी करणे, विविध विभागांसाठी कागदपत्र छपाई व बाईंडिंग खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये सोलर ऑपरेटेड आयओटी स्किल डेव्हलपमेंट लॅब विकसित करण्यासाठी 2.50 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.