सांगलीवाडी : येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार व समर्थकांनी सांगलीवाडीतील चौका-चौकात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सांगलीवाडीतून उमेदवारांनी आभार मानत पदयात्रा काढली.
सांगलीवाडी येथील प्रभाग तेरामध्ये भाजप विरूध्द महाविकास आघाडी, अशी थेट लढत झाली. माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत बनली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांनीही महाविकास आघाडी सोडून भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगली होती.
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित कोळी, काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील व अश्विनी कदम मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. माजी आमदार दिनकर पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या स्नुषा मीनल पाटील, महाबळेश्वर चौगुले व अनुराधा मोहिते यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
यावेळी उमेदवार अभिजित कोळी, दीपाली पाटील व अश्विनी कदम यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप पाटील, सचिन कदम, विष्णू पाटील, शशिकांत पाटील, अरविंद पाटील, मधुकर पाटील, प्रकाश सूर्यवंशी, जनार्दन गोंधळी, सचिन चव्हाण, लक्ष्मण भोसले, कुमार कोळी, संपत कोळी, बजरंग कदम, मदन पाटील या प्रमुखांसह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.