सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी जोरदार ताकद लावली होती. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने दणदणीत कामगिरी करत 16 जागांवर विजय मिळवला, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने सांगलीच्या राजकारणात अजित पवार यांची पकड मजबूत असल्याचे सिद्ध झाले. जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच अजित पवार गटाने स्वबळ आणि बार्गेनिंग पॉवर यावर लक्ष केंद्रित केले होते. मिरजेतील अनेक माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवून पक्षाने सुरुवातीलाच भाजप आणि काँग्रेसला धक्का दिला. सांगलीत अभिजित भोसले आणि सचिन सावंत यांच्यासारख्या सक्षम चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाने मजबूत पॅनेल मैदानात उतरवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मिरजेत जाहीर सभा घेतल्या आणि पूर्ण ताकद लावली. त्याचे फळ म्हणून 33 पैकी 16 जागा जिंकण्यात त्यांना यश आले.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, काँग्रेस आणि शरद पवार गटाशी केलेल्या छुप्या समझोत्याचा फायदाही या पक्षाला झाला. एवढे यश मिळूनही विजयनगर प्रभाग 8 मध्ये पक्षाला मोठा धक्का बसला. तिथे केवळ विष्णू माने हे एकमेव उमेदवार निवडून आले. प्रभाग 6 आणि 18 मध्ये अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने संख्याबळ 7 ने कमी झाले.
शरद पवार गटाला बालेकिल्ल्यातच फटका
आमदार जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अनेक दिवस सांगलीत तळ ठोकून आणि 22 उमेदवार मैदानात उतरवूनही त्यांच्या पदरी निराशाच आली. शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 3 जागा मिळाल्या. सांगलीवाडीत अभिजित कोळी यांनी खाते उघडले, तर प्रभाग 19 मध्ये दोन जागा मिळाल्या.
यापूर्वीच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाला मिळणारा प्रतिसाद या निवडणुकीत मतदानात रूपांतरित करण्यात पक्ष अपयशी ठरला. स्वतः जयंत पाटील यांनी ताकद लावूनही झालेला हा पराभव पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. भाजप 39 जागांवर अडकल्यामुळे आता महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अजित पवार गटाची 16 मते निर्णायक ठरणार आहेत. पद्माकर जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार, सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती असून, मतदारांनी दिलेल्या कौलानुसार ते किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.