सांगली : वर्षानुवर्षं हात बघून मतं देणारा हक्काचा मतदार असताना, इतरांना वैतागलेले मतदार सक्षम पर्याय म्हणून बघत असताना, हातून गेलेला बालेकिल्ला परत घ्यायला धडपडणारी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज असताना, विरोधकांवर तुटून पडावे इतके गाडी भरून मुद्दे असताना आणि परत एकदा जोरदार मुसंडी देऊन विजयाचा झेंडा रोवायची संधी असताना काँग्रेस कासवाच्या गतीनंच चालत राहिली. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ना राजकीय इच्छाशक्ती दिसली, ना खुन्नस. 34 पैकी 18 जागांवर हात बळकट झाला. बेरीज झाली असती, पण ती झाली नाही.
आमदार डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यातला संवाद बाहेरून दिसत असला तरी, आतून लवकर जुळला नाही... परिणामी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची निवडही घोडं-मैदान जवळ आल्यानंतर झाली. निवड झाल्यापासून ते स्वत:च उमेदवार असल्यानं घरच्याच लढाईत अडकले.
लढाई अगदी खिंडीत आल्यावर आमदार जयंत पाटील यांच्यासोबत आ. विश्वजित कदम आणि खा. विशाल पाटील यांनी उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेतल्या आणि मग तिथून पुढं काँग्रेस या निवडणुकीत खऱ्याअर्थानं सक्रिय झाली. पण तोवर बराच वेळ झाला होता. काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष एकत्रित लढायला तयार होत असताना, अजित पवार गटाकडून काही संकेत मिळत गेल्यानं पुन्हा दोन दिवस चर्चेत गेले आणि अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी दुपारी एक तास अगोदर काँग्रेस पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षानं 14 प्रभागात 34 शिलेदार उतरवले. पण तोवर खूप वेळ झाला होता. जे उमेदवार काँग्रेसच्या सिग्नलची वाट बघत बसले होते, पक्षावर विसंबून राहिले होते, ते वाट बघून बघून कधीच दुसरीकडं गेले होते. ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला.
दिरंगाईमुळे आव्हान वाढले
जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मदन पाटील गट भाजपवासी झाला. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बरेच काँग्रेस नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये गेले. पण त्यानंतर जितके गंभीर आणि त्वरित निर्णय घ्यायला हवे होते, ते काँग्रेस नेतृत्वाने त्या त्यावेळी घेतले नाहीत. परिणामी, खासदारकीनंतर रिचार्ज झालेली काँग्रेसची ताकद पुन्हा कोम्यात गेली, गोंधळात पडून राहिली. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी इतर पक्षांशी संधान बांधले. काँग्रेसच्या हक्काच्या प्रभागात भाजपचे आव्हान उभे राहिले, ते या दिरंगाईमुळे.