सांगली : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. रविवार हा प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरला. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, प्रचाराला अवघे दोन दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी अंतिम टप्प्यात प्रचाराची पूर्ण ताकद पणाला लावली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचारसभा, बैठका, पदयात्रा, घराघरांत संपर्क आणि मतदारांशी थेट संवाद सुरू आहे.
महापालिकेच्या 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच प्रभागांमध्ये लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. काही प्रभागांमध्ये ही लढत बहुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे प्रचारात कमालीची रंगत निर्माण झाली आहे. ‘हाय व्होल्टेज’ ठरणाऱ्या प्रभागांमध्ये तणाव आहे. आरोप-प्रत्यारोप, विकासकामांचे दावे आणि राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा हे प्रमुख पक्ष मैदानात आहेत. काही मोजक्या प्रभागांचे अपवाद वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, या तीन पक्षांची अघोषित आघाडी झाली आहे. तिरंगी, चौरंगी, बहुरंगी लढतींमुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांकडून विकासकामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वाहतूक आणि स्मार्ट शहरासंबंधी योजना, हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आले आहेत. काही प्रभागांमध्ये स्थानिक प्रश्न, तर काही ठिकाणी नेतृत्व आणि सत्तेचा मुद्दा अधिक ठळकपणे पुढे येत आहे. आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. रविवार, दि. 11 जानेवारी हा दिवस प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरला. उमेदवारांनी रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवसाचा प्रचारासाठी चांगलाच उपयोग करून घेतला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू होता.
महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. मतदान समाप्तीच्या 48 तास आधी जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचारास आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरीत वेळेत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष आणि उमेदवार धडपडताना दिसत आहेत. कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार, सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.