भाजपचे आधी अर्ज दाखल; नंतर यादी जाहीर Pudhari Photo
सांगली

Sangli Election : जोरदार शक्तिप्रदर्शनाने जाहीर प्रचाराची सांगता

पदयात्रा, रॅली, घोषणांनी शहर ढवळून निघाले : आता छुपा प्रचार, राजकीय हालचालींना वेग; उद्या मतदान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन करत मोटारसायकल रॅली, तसेच पदयात्रा काढल्या. घोषणाबाजी, फटाके, पारंपरिक वाद्यांच्या गजरात रॅली, पदयात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात निघाल्या. पदयात्रा व रॅलींमध्ये मोठ्या संख्येने गर्दी जमवण्यावर उमेदवार व कार्यकर्त्यांचा विशेष भर दिसून आला. जाहीर प्रचार संपला असला तरी, आता मतदान होईपर्यंत छुपा प्रचार सुरू राहील. तसेच राजकीय हालचालीही कमालीच्या वेगवान होतील. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.

महापालिका निवडणूक प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी प्रमुख राजकीय नेतेही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते. भाजपकडून आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, नीता केळकर, दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेक नेते पदयात्रा, मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते.

काँग्रेसकडून खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, पूजा पाटील यांनी पदयात्रा, मोटारसायकल रॅलीत सहभाग घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटीलही पदयात्रा, रॅलीत सहभागी झाले होते. शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई यांनी शहरात उपस्थिती लावली. राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना उबाठा यांसह अन्य पक्ष, अपक्ष उमेदवारांनीही प्रचार समारोपादिवशी पदयात्रा, रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

महापालिकेच्या निवडणुकीत 20 प्रभागांतील 78 जागांसाठी प्रारंभी तब्बल 1,062 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर 381 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. सर्व 78 जागांवर भाजपचे उमेदवार लढत असून शिवसेना 65, राष्ट्रवादी (अजित पवार) 33, काँग्रेस 33, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष 20 आणि शिवसेना (उबाठा) 35 जागांवर लढत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची आघाडी झाली असली तरी, काही प्रभागात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाबरोबर अघोषित समझोताही झालेला आहे. एकूणच तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढती रंगतदार ठरल्या आहेत. अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने मैदानात आहेत.

भाजपचा प्रचार प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला होता. त्यांनी महापालिका क्षेत्रातील विकासाबाबत विविध घोषणा केल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभा व बैठकांतून प्रचाराला धार दिली. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम यांनीही प्रचारात रंगत आणली. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, कलगीतुरा रंगला.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापासून म्हणजे 2 जानेवारी ते 13 जानेवारीदरम्यान प्रचार शिगेला पोहोचला. अखेर मंगळवार, 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली असून, आता मतदारांचे लक्ष मतदान आणि निकालाकडे लागले आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी, छुपा प्रचार, राजकीय हालचालींना गती येणार आहे. मतदान गुरुवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. मतमोजणी शुक्रवार, 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT