सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. काही प्रभागांतील किरकोळ बदल वगळता 2018 च्या निवडणुकीचीच प्रभाग रचना 2025 च्या निवडणुकीसाठी असणार आहे. गेल्या निवडणुकीत ही प्रभाग रचना भाजपसाठी फायदेशीर ठरली होती.
महापालिकेत पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणातून भाजप फ्रंटवर आली आहे, पण भाजपसह महायुतीतील घटक पक्षामधील इच्छुकांची भाऊगर्दी आणि गट-तट या आव्हानांना सामोरे जाताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी तन, मन, धन लावून निवडणूक लढवल्यास ‘टसल’ होणार आहे.
महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत भाजपने 78 पैकी 41 जागा जिंकून काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली होती. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेतृत्व करत स्वबळावर भाजपला सत्तेत आणले होते. आताही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षनेतृत्वाने त्यांच्यावरच सोपविली आहे. त्यानुसार त्यांनी यावेळीही बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. महापालिकेची महातयारी सुरू केली. काँग्रेसने सहा वर्षांसाठी जयश्री पाटील यांना निलंबित केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर राजकीय पोरकेपण आले होते. नेमके ते हेरून भाजपने हालचाली सुरू केल्या आणि जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश झाला. महापालिका क्षेत्रात मदनभाऊ गटाची ताकद बर्यापैकी आहे. ही ताकद मिळाल्याने भाजपचे बळ आणखी वाढणार, असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो. याशिवाय काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचाही भाजपात प्रवेश घडवून काँग्रेसला कमकुवत केले आहे.
लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय जिल्हाभरात काँग्रेसला नवे बळ देऊन गेला. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसमध्ये मरगळ आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ती अधिकच वाढत आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. जनसंपर्क वाढवला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली, मिरज फेर्या वाढल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शांत आहेत. त्यांनी महापालिका निवडणूक पुरेशा गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम हे तीन नेते मनापासून उतरले, तर निवडणुकीत रंगत येणार आहे. पण अजूनही हे तीन नेते एकत्र येताना दिसत नाहीत.
गणेशोत्सवात भाजपाचे नेते विशेष सक्रिय होते, मात्र महाविकास आघाडीचे नेते सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे काही अपवाद वगळता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बॅकफूटवर दिसत आहेत. महापालिका क्षेत्रात भाजपमध्ये नेते, कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्याबरोबरीने गट-तटही वाढले आहेत. त्यांना एकसंध ठेवण्याचे आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असणार आहे. महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. उमेदवारी वाटपातून नाराजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाराजी थोपवून निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर असणार आहे.