Sangli Municipal Election: 61 टक्के मतदान; मतदारांचा निरूत्साह  Pudhari
सांगली

Sangli Municipal Election: 61 टक्के मतदान; मतदारांचा निरूत्साह

381 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी गुरुवारी अवघे 61 टक्के मतदान झाले. एकूण 4,54,430 मतदार आहेत. मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. निवडणूक प्रचार अत्यंत चुरशीने झाला होता. पण ती चुरस मतदानात दिसून आली नाही. सुमारे 43 ते 44 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

दरम्यान, 78 जागांसाठी 381 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. कोण जिंकणार, सत्ता कोणाची, याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसच्या गोदामात शुक्रवारी (दि. 16) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 78 जागांसाठी 381 उमेदवारांनी निवडणूक लढवली. भाजप या एकमेव पक्षाने सर्व 78 जागांवर उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी 33, काँग्रेस 33, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 20, शिवसेना 65, तर शिवसेना उबाठाचे 35 उमेदवार होते. अपक्षांची संख्या मोठी होती. ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष अशी आघाडी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्र्रवादीचा या आघाडीशी अघोषित समझोता, अशा पद्धतीने झाली. निवडणुकीचा प्रचार चुरशीने झाला. भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले होते. भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभांनी निवडणुकीचे वातावरण तापले. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम, भाजपचे आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील यांनीही निवडणूक प्रचार तापवला. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

मतदान मंदगतीने सुरू

गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. एकूण 20 प्रभागातील 527 बुथवर मतदान सुरू झाले. सकाळी 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग तुलनेने मंद राहिला. या वेळेत केवळ 6.45 टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात 29,296 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुढील दोन तासात मतदानाचा वेग थोडा वाढला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत मतदान 17.20 टक्के झाले. एकूण 78,171 मतदारांनी मतदान केले. दुपारच्या सत्रात मतदारांची गर्दी वाढली. दुपारी दीड वाजेपर्यंत 29.23 टक्के मतदान झाले. 1,32,809 मतदारांनी मतदान केले. दुपारी 3.30 वाजता मतदानाचा टक्का 41.79 इतका होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 1,89,915 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 1 मध्ये 49.03 टक्के, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 44.39, 3 मध्ये 39.32, 4 मध्ये 39.14, 5 मध्ये 40.22, 6 मध्ये 39.18, 7 मध्ये 35.62, 8 मध्ये 39.29, 9 मध्ये 41.65, 10 मध्ये 36.82, 11 मध्ये 46.55, 12 मध्ये 48.17, 13 मध्ये 52.84, 14 मध्ये 40.44, 15 मध्ये 40.63, 16 मध्ये 40.85, 17 मध्ये 39.37, 18 मध्ये 41.79, 19 मध्ये 37.23 आणि 20 मध्ये 48.22 टक्के मतदान नोंदवले गेले.

वेळ संपत आली अन्‌‍ लागल्या रांगा

दुपारी 4 नंतर बहुसंख्य मतदान केंद्रांवर गर्दी होऊ लागली. सायंकाळी 5.30 वाजता मतदानाची वेळ संपली. मात्र त्यावेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. सांगलीत प्रभाग क्रमांक दहामधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शाळेतील केंद्रावर रात्री 7 वाजताही मतदारांची रांग लागलेली होती. प्रभाग क्रमांक अठरामधील त्रिमूर्ती कॉलनी, कुंभार प्लॉट येथील मतदान केंद्रावर रात्री सातनंतरही मतदान सुरू होते. सांगलीवाडी येथील मतदान केंद्र, सांगलीतील राममंदिरमागील मतदान केंद्र, जी. ए. कॉलेज येथील मतदान केंद्र, तसेच अन्य काही केंद्रांवरही मतदानासाठी रांग लागली होती. काही केंद्रांवर रात्री साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

मतमोजणीस प्रशासन सज्ज

प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. मिरज शासकीय गोदाम (सेंट्रल वेअर हाऊस) येथे शुक्रवार, दि. 16 रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे. सहा निवडणूक क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतमोजणीची व्यवस्था केली आहे. एकावेळी सहा प्रभागांची 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. प्रभाग क्रमांक 6, 9, 14 व 16 या चार प्रभागात बुथ संख्या जास्त असल्याने मतमोजणीच्या तीन फेऱ्या, तर उर्वरित 16 प्रभागात मतमोजणीच्या 2 फेऱ्या होणार आहेत.

एकूणच भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी प्रमुख लढत आहे. शिवसेनेनेही आव्हान उभे केले आहे. मतदानाचा टक्का घटला असल्याने कोणाला बहुमत मिळणार आणि सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता ताणली आहे.

मतदान सुरळीत, शांततेत...

निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली, मिरज आणि कुपवाडमधील पंधरा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन, सूचना केल्या. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (निवडणूक) अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील यांनीही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. मतदान सुरळीत व शांततेत पार पडले.

बोगस मतदान; मतदाराचा संताप

येथील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सह्याद्रीनगरमधील मतदान केंद्रावर मतदार इरफान शेख हे बुथ क्रमांक 13 याठिकाणी मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली मतदार स्लिप अधिकाऱ्यांना दाखवली; पण त्याठिकाणी अगोदरच कोणीतरी मतदान करून गेल्याचे निदर्शनास आले. मतदान करायला न मिळाल्याने शेख संतप्त झाले. बोगस मतदान प्रकाराची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी केली.

ऐनवेळी गोंधळ; नाव लगतच्या प्रभागात

शामरावनगर परिसर प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहे. या परिसरातील 38 मतदारांची नावे लगतच्या 17 नंबर प्रभागात असल्याचे निदर्शनास आले. वेगळे उमेदवार, वेगळी चिन्हे यामुळे या मतदारांचा गोंधळा उडाला. अन्यत्रही असे काही प्रकार घडले. मतदार यादीतील घोळाचा फटका काही मतदारांना बसला. दरम्यान, काही मतदान केंद्रांचे ठिकाण बदलल्यानेही काही मतदारांना त्रास सहन करावा लागल्याकडे काही कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.

स्लिपवर नाव आईचे, फोटो मुलाचा

प्रशासनाकडून वाटप करण्यात आलेल्या काही मतदार स्लिपांमध्ये चुका समोर आल्या. गावभागातील एका मतदान केंद्रावर मतदार स्लिपवर आईचे नाव असून फोटो मात्र मुलाचा असल्याचा प्रकार समोर आला. संबंधित मतदार आपल्या आईला घेऊन मतदानासाठी केंद्रावर गेले असता, हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. या मतदाराचे नाव ऑनलाईन प्रणालीत दिसत नव्हते; मात्र प्रत्यक्ष मतदार यादीत नाव आढळल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मतदानाचा हक्क बजावू दिला.

आयुक्तांकडून दखल; रुचकर जेवण, कॅडबरीही

मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री मतदान केंद्रावरील अमतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना विलंबाने जेवण मिळाले. बुधवारी दुपारीही जेवण म्हणून केवळ भात, कांदा आणि लिंबू मिळाला होता. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी याची गंभीर दखल घेत संबंधितांना कडक सूचना दिल्या. परिणामी गुरुवारी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांना सकाळी अगदी वेळेत चहा, बिस्किटे, नाष्टा, कॅडबरी, चॉकलेट, फ्रूट ज्यूस, तसेच रुचकर जेवण आणि केळी मिळाली. आयुक्त गांधी यांच्या या नियोजनवर मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी खूश झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT