सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सांगली पोलिसांनी महापालिका क्षेत्रात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये पोलिस अधीक्षकांसह 99 अधिकारी आणि 1115 पोलिस, होमगार्ड कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच संवेदनक्षम असणाऱ्या 31 ठिकाणी छावणीही उभारण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारावर यांच्या नेतृत्वात 7 उपअधीक्षक, 26 पोलिस निरीक्षक, 64 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, 415 पोलिस अंमलदार, 700 होमगार्ड, राखीव दलाच्या तुकड्या, दोन दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दल व सीसीटीव्ही व्हॅन असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून पोलिस दल ‘अलर्ट मोड’वर आले आहेत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आढावा बैठकाही घेतल्या जात आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दीड हजार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच चार टोळ्यांतील 18 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मिरजेतील प्रथमेश ढेरे या टोळीवरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ पोलिसांना हालचाली करता येणे शक्य होणार आहे. तीनही शहरांत सीसीटीव्ही व्हॅनची गस्त घातली हात आहे. संवेदनक्षम असणाऱ्या प्रभागांमध्ये ठिकठिकाणी दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तसेच जादा कुमक तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
संवेदनक्षम प्रभागांमध्ये जादा कुमक
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील काही प्रभाग संवेदनक्षम आहेत. निकालानंतर त्या ठिकाणी तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा चार ते पाच प्रभागांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या ठिकाणी जादा पोलिस कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.