सांगली ः केंद्रात, राज्यात आठ वर्षांची सत्ता असूनही भाजपला महापालिकेच्या विकासासाठी काहीही करता आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची नैसर्गिक महाविकास आघाडी बहुमतापर्यंत जाईल, असा दावा आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, संजय बजाज, विक्रम सावंत, शेखर माने आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, आयर्विन पुलास समांतर पर्यायी पूल, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागरिकांची रक्त तपासणी आदी विषय आम्ही मार्गी लावले. त्याचे श्रेय भाजपा घेत आहे. कवलापूर विमानतळ, पूरनियंत्रणासाठी आम्ही प्रयत्न केले. शहरात कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची पुस्तिका प्रकाशित करण्यापासून प्रशासनाने आम्हाला रोखले. या पुस्तिकेद्वारे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले असते, याची त्यांना भीती वाटत असावी.
आमदार विश्वजित कदम म्हणाले, तीनही शहरांच्या विकासाचा आराखडा आमच्याकडे आहे. गेल्या काही वर्षात विकासकामे गतीने झालेली नाहीत. खासदार विशाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिले आहेत. काहीनी गुंड प्रवृत्तीचे उमेदवार दिले. निवडणूक जिंकण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे.