सांगली ः शहरातील आमराई परिसरातील 24 मजली इमारतीचा बांधकाम परवाना देण्यासाठी महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (वय 31, रा. ग्रीन एकर्स, धामणी रोड, सांगली, मूळ रा. सातारा) याला सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. त्याच्यावर रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली होती.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार तानाजी रुईकर यांच्या कंपनीमार्फत आमराई रस्त्यावर 24 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी प्रस्ताव दिला होता. चार महिन्यांपासून बांधकाम परवान्याबाबत तक्रारदारांना टोलवाटोलवी सुरू होती. दरम्यानच्या काळात विश्रामबाग परिसरातील एका जिमजवळ उपायुक्त साबळे याने तक्रारदाराला बोलावून, परवान्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. 25 फेब्रुवारी 2025 रोजी तडजोडीअंती सात लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली.
तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत पडताळणी सुरू केली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला. वरिष्ठ कार्यालयाने साबळे याच्यावर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, उपअधीक्षक पाटील यांची बदली झाली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकपदी अनिल कटके यांची नियुक्ती झाली. त्यांनी पदभार हाती घेताच साबळे याच्यावरील कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक महापालिकेत दाखल झाले. यावेळी साबळे त्याच्या कार्यालयात होता. पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर रात्री उशिरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके, उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, सुदर्शन पाटील, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने केली.
साबळे याच्या लाच प्रकरणात महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्याच्या नावाचीही चर्चा होती. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत त्या वरिष्ठ अधिकार्याचा संबंध आढळून आला नाही. उपअधीक्षक कटके यांनीही त्याला दुजोरा दिला.
वैभव साबळे मूळचा सातारा येथील आहे. त्याने सिंधुदुर्ग येथे जिल्हा प्रशासन अधिकारी, तसेच इस्लामपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्याची सांगली महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांपासून तो उपायुक्त आहे.
साबळे याच्यावर कारवाई केल्याचे वृत्त समजताच येथील कर्मवीर चौकात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्र (मंगलधाम सेंटर) येथे काहीजणांनी फटाक्यांची आतषबाजी केली. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या परिसरातही काहींनी गर्दी केली होती.
वैभव साबळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याने सांगली, इस्लामपूर, सातार्यात खळबळ उडाली. पथकाने साबळे याच्या धामणी रोड व सातारा येथील घरांवर छापे टाकून झडती घेतली. तेथे काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. या छाप्याबाबत पथकाने गोपनीयता पाळली आहे.