सांगली: जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या आठ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज (दि.२१) मतमोजणी पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता उमेदवारांचे भवितव्य मशिनमधून बाहेर येणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून अवघ्या काही वेळातच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीत जिल्हयातील आजी-माजी आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपापल्या बालेकिल्ल्यात वर्चस्व राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आणि दिग्गज नेत्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे या निकालाचा परिणाम आगामी जिल्ह्याच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे बोलले जात आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी मतमोजणी केंद्रांबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या थेट नेतृत्वाखाली ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून यामध्ये ८५ वरिष्ठ पोलीस अधिकारी, १,३३६ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे.
प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी स्वतंत्र मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीचे कल लवकरच स्पष्ट होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.