Sangli Municipal Council Election Result 2025: ईश्वरपूर, आष्ट्यात जयंतराव ‌‘बाजीगर‌’ Pudhari Photo
सांगली

Sangli Municipal Council Election Result 2025: ईश्वरपूर, आष्ट्यात जयंतराव ‌‘बाजीगर‌’

पलूसला विश्वजित यांनी गड राखला; जत, आटपाडीत भाजप; विटा, शिराळ्यात शिवसेना; तासगावात संजय पाटील यांचे कमबॅक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्ह्यात 6 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट झाले. प्रमुख राजकीय ताकदीचं समसमान विभाजन झालं आहे. जत नगरपरिषद आणि आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुसंडी मारली आहे. विटा आणि शिराळा नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे) पक्षाने विजय मिळवला. ईश्वरपूर आणि आष्ट्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुत्तीचा धुव्वा उडवला. आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूरचे नगराध्यक्षपद भाजपकडून खेचून घेतले.

पलूस नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला, तर तासगाव नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी विकास आघाडीने आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला.

जिल्ह्यात 6 नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका अतिशय चुरशीने झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रचारसभा घेऊन निवडणुकीचे राजकारण तापवले होते. जिल्ह्यात कोणता पक्ष नंबर वन होणार, याकडे लक्ष लागले होते, पण निवडणूक निकालाने प्रमुख राजकीय पक्षांना समान ताकदीवर आणून सोडले आहे.

शिराळ्यात महायुतीचा झेंडा

शिराळा नगरपंचायतीची निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे) विरुद्ध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चुरशीने झाली. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंह भगतसिंग नाईक विजयी झाले. त्यांना 5205 मते पडली, तर विरोधी राष्ट्रवादीचे अभिजित नाईक यांना 4932 मते मिळाली. नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी भाजपला 9, शिवसेना (शिंदे) 2, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या 4 जागा निवडून आल्या. दोन अपक्ष निवडून आले आहेत. भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना (शिंदे) पक्षाचे भगतसिंग नाईक यांच्या नेतृत्वाला यश मिळाले.

ईश्वरपूर, आष्ट्यात महायुतीला झटका

ईश्वरपूरमध्ये महायुतीने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांना घेरले होते. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे विजयी झाले. त्यांना 26 हजार 731 मते मिळाली. भाजपचे विश्वनाथ डांगे यांचा पराभव झाला. त्यांना 19 हजार 343 मते मिळाली. नगरसेवक पदाच्या 30 जागांपैकी 22 जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला, तर 8 जागा महायुतीला मिळाल्या. महायुतीत भाजपला 3, राष्ट्रवादीला 3, शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. आष्टा नगरपरिषदेत आमदार जयंत पाटील आणि वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आष्टा शहर विकास आघाडीने महायुतीचा सुपडासाफ केला. आघाडीला 23, तर महायुतीतील राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. नगराध्यक्षपदाचे आघाडीचे विशाल शिंदे विजयी झाले.

पलूसमध्ये पुन्हा काँग्रेस; भाजपला दणका

पलूस नगरपरिषदेत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले विजयी झाल्या. त्यांना 6981 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) ज्योत्स्ना येसुगडे यांना 5631, तर भाजपच्या सोनाली नलवडे यांना 4691 मते मिळाली. नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 15 काँग्रेसला, 4 राष्ट्रवादी (अजित पवार)ला आणि भाजप केवळ एका जागेवर विजयी झाला. काँग्रेसचा हा गड राखण्यात आ. डॉ. विश्वजित कदम यशस्वी झाले. भाजपचा पराभव हा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाला झटका मानला जात आहे.

आटपाडीत भाजप; पडळकरांना ताकद

आटपाडी नगरपंचायतीत भाजप, शिवसेना (शिंदे) आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यु. टी. जाधव यांनी 7 हजार 56 मते मिळवत विरोधी शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार रावसाहेब सागर यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या निकालाने आमदार गोपीचंद पडळकर यांना ताकद मिळाली. नगरसेवक पदाच्या 17 जागांपैकी 8 जागा शिवसेना (शिंदे), भाजप 7, राष्ट्रवादी (अजित पवार) 1, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 1 जागा मिळाली.

तासगावमध्ये संजय पाटील यांचे कमबॅक

तासगाव नगरपरिषदेची निवडणूक पंचरंगी झाली. आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी विकास आघाडी यांच्यात ही निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवार विजया बाबासाहेब पाटील यांनी 9541 मते मिळवत विरोधी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वासंती सावंत यांचा 99 मतांनी पराभव केला. नगरसेवक पदाच्या 24 पैकी 13 जागा स्वाभिमानी विकास आघाडीला, तर 11 जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळाल्या. या निवडणुकीतील विजयाने माजी खासदार संजय पाटील यांचे राजकीय कमबॅक झाले आहे, तर भाजप खूपच पिछाडीवर राहिला आहे.

जतेत भाजपचा झेंडा

जत नगरपरिषदेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) अशा तिरंगी लढतीत भाजपने विजय मिळवला. नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना 9112 मते मिळाली. विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुजय शिंदे यांना 6616, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुरेश शिंदे यांना 3470 मते मिळाली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. नगरसेवक पदाच्या 22 पैकी 11 जागा भाजपला, 8 जागा काँग्रेसला, तर 3 जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळाल्या. विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा भाजपला झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT