सांगली : महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या 4 सभापतींची मुदत दि. 31 मार्च 2026 रोजी संपली. चारही सभापतींना केवळ 19 दिवसच मुदत मिळाली. प्रभाग समिती सभापती निवडी लवकरच म्हणजे चालू महिन्यात घ्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून पुणे विभागीय आयुक्तांना कळवण्यात येणार आहे. विद्यमान सभापतींनाच पुन्हा संधी मिळणार आहे.
महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक दि. 13 मार्च 2026 रोजी बिनविरोध झाली होती. प्रभाग समिती 1 च्या सभापतिपदी अश्विनी कोळेकर (काँग्रेस), प्रभाग समिती 2 च्या सभापतिपदी वैशाली गवळी (भाजप), प्रभाग समिती 3 च्या सभापतिपदी माया गडदे (भाजप), प्रभाग समिती 4 च्या सभापतिपदी अश्विनी कोळी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष यांची निवड झाली होती.
महापालिका अधिनियमात याबाबत तरतूद आहे. यातील कलम चारमधील पोटकलम (2) च्या उप-खंड (अ) मध्ये नमूद आहे की, निवडून आलेले पालिका सदस्य, प्रभाग समितीच्या प्रत्येक सरकारी वर्षातील पहिल्या सभेत त्यांच्या स्वत:मधून सभापती निवडून देतील आणि ते लगतनंतरच्या सरकारी वर्षातील पहिल्या सभेपर्यंत पद धारण करतील.
त्यानुसार दि. 13 मार्च 2026 रोजी निवड झालेल्या सभापतींची मुदत दि. 31 मार्चपर्यंत होती. हे सभापती आता एप्रिल 2026 मधील सभेपर्यंत सभापती पद धारण करतील. राजकीय पक्षांमध्ये यापूर्वी ठरल्यानुसार अश्विनी कोळेकर, वैशाली गवळी, माया गडदे, अश्विनी कोळी यांचीच पुन्हा सभापतिपदी निवड होईल.