सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणीपट्टीची चालू बिले आणि थकबाकीची रक्कम मुदतीत भरावी. थकबाकीची रक्कम न भरल्यास दिवाळीनंतर पाणी कनेक्शन तोडण्यात येणार आहे. पाणीपट्टीची थकीत रक्कम सुमारे ७२ कोटींवर आहे. ५ लाखांहून अधिक पाणीपट्टी थकीत असलेल्या ग्राहकांची संख्या ७६ आहे. पाणी कनेक्शन तोडणे, दंड आकारणी आदी कारवाई सर्वच थकबाकीदारांवर केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त अश्विनी पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सांगली, मिरज आणि कुपवाड शहराला पाणीपुरवठा होतो. या तीन शहरांत एकूण ९९,६२६ नळजोडण्या आहेत. महापालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी ४५ कोटी ११ लाख रुपये आहे. चालू मागणी ६ कोटी ६४ लाख रुपये असून, थकबाकीवरील विलंब शुल्क २७ कोटी १० लाख रुपये आणि चालू पाणीपट्टीवरील विलंब शुल्क ७० लाख रुपये आहे. गेल्या सात महिन्यांत थकबाकीपोटी ३ कोटी ६४ लाख जमा झाले आहेत. चालू मागणीपोटी १ कोटी, तर विलंब शुल्कापोटी ३७ लाख ८१ रुपये वसूल झाले आहेत. मागणीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमी आहे. थकबाकी वसुलीसाठी दिवाळीनंतर मोहीम राबवली जाणार आहे. थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन तोडले जाणार आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना पाणीपट्टी बिलांचा भरणा करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, या उद्देशाने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीतील पाणीपट्टी बिलांवर दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन पाणीपट्टी बिले दि. ३० नोव्हेंबरपूर्वी भरावीत. पाणीपट्टीचा वेळेत भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले आहे.
ऑनलाईन बिल भरण्यात अडचणी
२०२६-२७ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांची पाणीपट्टी बिले वितरित करण्यात आली आहेत. या बिलांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता यावा, यासाठी महापालिकेमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तथापि, ऑनलाइन बिल भरणा प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी तसेच बिलांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे नागरिकांना पाणीपट्टीचा भरणा करताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.