सांगली : महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता महापालिकेतील स्थायी समिती सभापती आणि सदस्य निवडीकडे लक्ष लागले आहे. अनेक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचे वेध लागले आहेत. स्थायी समिती सदस्य निवडी महिनाअखेरपर्यंत होतील. त्यानंतर स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठीही अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत.
महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्यांची संख्या 16 आहे. पक्षनिहाय संख्याबळानुसार स्थायी समितीत सदस्यत्वाची संधी मिळते. महापालिकेत भाजपचे 39, काँग्रेसचे 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3, शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. हे संख्याबळ पाहता स्थायी समितीत भाजपच्या 8, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 3 व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नगरसेवकाला संधी मिळेल. त्यासाठी या पक्षातील नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेत स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या समितीत जाण्यासाठी नगरसेवक इच्छुक असतात. त्यामुळे अनेक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचे वेध लागले आहेत.
स्वीकृत वाढले; इच्छुकही वाढले
राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने दि. 23 मार्च 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक संख्येत बदल झाला आहे. निवडून आलेल्या नगरसेवक संख्येच्या 10 टक्के किंवा दहा यापैकी कमी असलेली संख्या ही स्वीकृत नगरसेवक संख्या असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या 78 आहे. त्यानुसार स्वीकृत नगरसेवक संख्या आता 8 असेल. महापालिकेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक होतील. या निवडीही स्थायी समिती सदस्य निवडीबरोबरच महासभेत होतील, असे संकेत मिळत आहेत.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. स्वीकृत नगरसेवकपद एक-एक वर्षासाठी देऊन अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचे पक्षनेत्यांनी ठरवलेले आहे. पण प्रथम संधी कोणाला, यावरून रस्सीखेच होणार, हे स्पष्ट आहे. भाजपकडून युवा मोर्चाचे माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष सुजीत राऊत, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, केदार खाडिलकर, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंढे, विजय पाटील (सांगलीवाडी), संजय कांबळे हे प्रामुख्याने स्वीकृत नगरसेवकपदाच्या शर्यतीत आहेत. काँग्रेसकडून दोनपैकी एक स्वीकृत नगरसेवकपद मुस्लिम समाजाला मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसकडे दहा इच्छुकांचे मागणी अर्ज आले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडेही इच्छुकांची संख्या मोठी आहे.