सांगली महापालिका Pudhari Photo
सांगली

Sangli News : ‘स्थायी‌’साठी इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी

सभापती पदासाठी आमदार गाडगीळ समर्थकास संधी ः विषय समिती निवडीकडेही लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापौर, उपमहापौर निवडीची आता केवळ औपचारिकता उरली आहे. नगरसेवकांनी आता स्थायी समिती सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समितीत भाजप 8, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 3, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 1, असा सदस्य कोटा आहे. त्यासाठी या पक्षांमधील इच्छुक नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समिती सभापतीपद आमदार सुधीर गाडगीळ समर्थक नगरसेवकास मिळेल, असे संकेत मिळत आहेत. सभापतीपदासाठी अतुल माने यांचे नाव आघाडीवर आहे.

महापालिकेतील सत्ता केवळ महापौरपदापुरती मर्यादित नसते. स्थायी समितीलाही मोठे महत्व आहे. प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे स्थायी समितीकडे केंद्रीत झालेली असतात. त्यामुळे स्थायी समितीतील बहुमत महत्वाचे असते. स्थायी समितीत 16 सदस्य असतात. स्थायी समिती सभापतीपदाच्या बहुमतासाठी 9 सदस्यांची गरज आहे. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीत युतीचे संख्याबळ 11 होते. स्थायी समितीत 16 सदस्यांपैकी भाजपचा सदस्य कोटा 8 आहे. काँग्रेसचा 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 3, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 सदस्य कोटा आहे.

भाजपचे 39 नगरसेवक आहेत. त्यापैकी कोणत्या 8 सदस्यांना स्थायी समितीत संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या 18 नगरसेवकांमधून कोणत्या 4 नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लागणार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 16 नगरसेवकांमधून 3, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांमधून 1 सदस्य स्थायी समितीवर जाणार आहे. स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नगरसेवकांची नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महापालिकेत गटनेतेपदी संदीप आवटी यांची निवड झालेली आहे. भाजप नेते सुरेश आवटी यांचे ते चिरंजीव आहेत. आमदार सुरेश खाडे आणि आवटी यांच्यात बरेच सख्य आहे. धीरज सूर्यवंशी यांना महापौरपदाची संधी मिळाली आहे. सूर्यवंशी यांच्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष मर्जी आहे. शिवाय प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्याशीही त्यांचे सख्य आहे. आता स्थायी समिती सभापतीपद आमदार सुधीर गाडगीळ समर्थकास मिळेल, असे संकेत मिळत आहेत. आमदार गाडगीळ यांचे कट्टर समर्थक अतुल माने यांचे नाव आघाडीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT