Tasgaon Panchayat Samiti 
सांगली

‌Sangli News : ‘त्या‌’ शाखा अभियंत्याला ‌‘कारणे दाखवा‌’ नोटीस

तासगाव पंचायत समितीमधील हाणामारीची गंभीर दखल

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आर्थिक देवाण-घेवाणीवरून शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या हाणामारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी उपअभियंता मधुमती कुलकर्णी यांनी संबंधित शाखा अभियंता ए. के. बारवकर यांना ‌‘कारणे दाखवा‌’ नोटीस बजावली आहे. यामुळे पंचायत समितीत अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आर्थिक वादातून शाखा अभियंता बारवकर आणि एका ठेकेदारात हाणामारीचा प्रकार घडला होता. हा प्रकाराने बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. बांधकाम विभागाच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने हा प्रकार दडपण्याचे प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून सुरू होते.

मात्र गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन उपअभियंता कुलकर्णी यांना तातडीने कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. सोमवारी उपअभियंता कुलकर्णी यांनी शाखा अभियंता बारवकर यांना ‌‘कारणे दाखवा‌’ नोटीस बजावली. बारवकर यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, शासकीय कार्यालयात झालेली घटना प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसून ही घटना कार्यालयाची प्रतिमा मलिन करणारी आहे. तरी आपणावर जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई का करण्यात येऊ नये. याचा खुलासा सदर नोटीस मिळालेपासून तात्काळ (72 तासाचे आत) कार्यालयाकडे सादर करावा. खुलासा मुदतीत अथवा समाधानकारक प्राप्त न झाल्यास सूचित केलेप्रमाणे कारवाई करण्यात येईल. शासकीय कार्यालयात शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यात हाणामारीची घटना होण्याचा पहिलाच प्रसंग घडला असल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT