नंदू गुरव
सांगली : सांगलीला महानगरी का म्हणावं, हा सवाल सांगलीकरांनाच पडावा, अशी एक सो एक 'कर्तृत्वं' महापालिकेनं करून ठेवली आहेत. जागा बघायच्या, तिथं झटक्यात फटाफट काहीतरी बांधायचं आणि जे हात वर करायचे, ते पुन्हा खालीच करायचे नाहीत, असा सारा कारभार. राम मंदिर चौकातलं शॉपिंग सेंटर हा त्याचा एक नमुना.
राम मंदिर चौकातलं शॉपिंग सेंटर. अगदी मोक्याची जागा. असंख्य आरोप-प्रत्यारोपातून ते एकदाचं सुरू झालं. समोर रस्त्यावरून चालताना या शॉपिंग सेंटरकडं नजर टाकली, की सांगलीकरांची छाती अभिमानानं फुटते. बड्या कंपन्यांच्या शोरूम्सनी हे सेंटर सजलं आहे. अनेक गाळे कधी चालू कधी बंद अवस्थेत आहेत. याच सेंटरमध्ये महापालिकेचं वि. स. खांडेकर वाचनालयसुध्दा आहे. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाला इतकी हायफाय जागा मिळावी, हेसुध्दा नशीबच. वाचनालयात नेहमी गर्दी. शिवाय अभ्यासिकाही आहे. तिथं हुशार मुलांची गर्दी.
पण ही झाली समोरची बाजू. ही समोरची बाजू जितकी लखलखीत आहे, अगदी तिच्याविरुध्द मागील बाजू काळीकुट्ट आहे. या मागील बाजूला छोटंसं खुलं नाट्यगृह आहे. मोकळ्या जागेत समोर व्यासपीठ आणि त्यासमोर नैसर्गिक उंचवट्यावर दगडी चौथरे रचून केलेली बैठक व्यवस्था. अगदी देखणं, नैसर्गिक असलेलं हे खुलं नाट्यगृह, पण महापालिकेला ते जपता आलं नाही. जितकी म्हणून वाट लावता येईल तितकी लावली आहे. सेंटरच्या दोन्ही बाजूनी आत यायला मोकळा रस्ता आहे. रात्री इथं कसले उद्योग चालत असतील, ते इथं पडलेल्या दारूच्या मोकळ्या बाटल्यांवरूनच समजतं. आव जाव घर तुम्हारा... अशी अवस्था आहे. यावर लक्ष ठेवण्याची, स्वच्छता आणि सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
दारूच्या बाटल्या
बांधल्यापासून एकही कार्यक्रम न झाल्याचा विक्रम या संकुलामागील खुल्या नाट्यगृहाचा आहे. कोपऱ्यात दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. खरं तर या ठिकाणी अनेक लहान साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेता येतील. पण इतकी दृष्टी आहे कुणाला? आपल्या स्वत:च्या वाचनालयाचे कार्यक्रम इथं घ्यायचं धाडस महापालिका करत नाही, तिथं दुसऱ्याची काय अवस्था?