Sangli Municipal Corporation Pudhari Photo
सांगली

Sangli Municipal Corporation : महापालिकेतील भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सीसोबत करार

स्थायी समिती सभेत मंजुरी; १७ सप्टेंबरच्या महासभेत वादळी चर्चेचे संकेत; प्रशासनाची लागणार कसोटी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेतील ४१ पदांवरील सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत करारपत्र करण्यास तसेच पदभरतीसाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा ठराव अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, भरतीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय महासभेत होण्यापूर्वीच स्थायी समितीसमोर करारपत्रास मंजुरीचा विषय आणल्याने दि. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक तसेच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व अधिकारी उपस्थित होते. तांत्रिक ८२ पदांवर भरतीसाठी महापालिकेने शासनाला प्रस्ताव पाठवला होता. शासनाने ४१ पदांवर भरतीसाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान, भरतीसाठी एजन्सी म्हणून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी यांचा प्रस्ताव होता. तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने टाटा कन्सल्टन्सीची शिफारस केली होती. त्यानुसार टाटा कन्सल्टन्सीसोबत करारपत्र करणे व भरतीसाठी येणाऱ्या खर्चास मंजुरीचा विषय स्थायी समितीपुढे आला होता.

सभेत प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. टाटा कन्सल्टन्सीचा प्रति उमेदवार ७९७ रुपये खर्च, कंपनीला इतर संस्थांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्याचा असलेला अनुभव तसेच नियुक्तीशी संबंधित विविध बाबींचा विचार करण्यात आला. ४१ पदांवरील सरळसेवा भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी करार करण्यास व येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दि. १७ रोजी होणाऱ्या महासभेपुढे ४१ तांत्रिक पदे भरतीसाठी एजन्सी नियुक्ती, भरतीमुळे आस्थापना खर्च वाढणार असल्याने त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा विषय आहे.

चिकन, मटण वेस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई

महापालिका क्षेत्रात 'चिकन ६५'ची विक्री करणाऱ्या हातगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उघड्यावर चिकन वेस्ट टाकले जात असल्याने वर्दळीच्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी आणि त्यांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडे तसेच प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याचे पडसाद स्थायी समिती सभेत उमटले. उघड्यावर चिकन, मटण वेस्ट टाकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करावा, तसेच हॉटेल वेस्ट संकलनाचे काम असलेल्या कंपनीने सायंकाळी हॉटेलमधील कचरा तातडीने संकलित करावा, असे निर्देश माने यांनी दिले.

नगरसेवक निधीतील कामांचा आढावा

महापालिका निधीतून प्रत्येक नगरसेवकाला १५ लाख रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. त्यातून प्रस्तावित केलेल्या कामांचा तसेच उद्याने व अन्य विकास कामांच्या निविदा प्रक्रियेचाही सभेत आढावा घेण्यात आला. या कामांची एकूण किंमत सुमारे १८ ते २० कोटी रुपये असल्याची माहिती सभेत देण्यात आली. सर्व कामांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT