Sangli Municipal Corporation Pudhari
सांगली

Sangli News : महापालिकेतील वर्दळ ओसरली

निवडणूक आचारसंहितेचा परिणाम; बहुसंख्य नगरसेवक नाहीत फिरकले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच तिचे थेट परिणाम महानगरपालिकेत दिसून आले आहेत. बुधवारी मुख्यालयात नेहमी असणारी राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्दळ पूर्णपणे ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मोजके पदाधिकारी वगळता बहुसंख्य नगरसेवक महापालिकेकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे महापालिका मुख्यालयात दिवसभर कमालीची शांतता पसरली होती.

महापालिका मुख्यालयात पदाधिकारी, नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांची रोज सकाळी १० वाजल्यापासूनच गर्दी असते. विविध विकासकामे, प्रभागातील रस्ते, पाणी, सांडपाण्याचे प्रश्न, नागरिकांच्या तक्रारी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दालनांमध्ये नगरसेवकांच्या भेटीगाठींचा धडाका सुरू असतो. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच या सर्व राजकीय हालचालींना अचानक ब्रेक लागला आहे.

बुधवारी महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या नियमित कामकाजात व्यस्त असल्याचे दिसून आले. मात्र, अधिकाऱ्यांना कामासाठी भेटायला येणाऱ्या सामान्य नागरिकांची संख्याही नेहमीच्या तुलनेत बरीच कमी झाली होती. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची दालने आणि संपूर्ण महापालिका मुख्यालय परिसर ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

निवडणूक आचारसंहितेच्या नियमांमुळे नवीन विकासकामांशी संबंधित धोरणात्मक निर्णय, उद्घाटने, भूमिपूजन, नवीन योजनांच्या घोषणा तसेच कोणत्याही राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमांवर निर्बंध येतात. त्यामुळेच पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या महापालिकेतील नियमित फेऱ्या व बैठका पूर्णपणे थांबल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT