सांगली : महापालिकेचे वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर भाड्याने चालवण्यास देण्याचा प्रस्ताव अखेर दि. २० जुलै रोजीच्या महासभेसमोर आणण्यात आला आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी, काही नगरसेवकांनीही हे हॉस्पिटल खासगी संस्था/व्यक्तींना चालविण्यास देण्यास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महासभेत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. राजवाडा चौकातील संत दासराम केळकर महाराज व्यापारी संकुलातील भाड्याने दिलेले तीन दुकान गाळे विक्रीचा विषयही महासभेपुढे आहे.
महापालिकेची महासभा सोमवार, दि. २० रोजी होणार आहे. या महासभेत वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर ३० वर्षांच्या मुदतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे. या विषयावर सभेत जोरदार चर्चा होणार आहे. महापालिकेने वारणाली येथे सुमारे १५ कोटी रुपये खर्चून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत उभारली आहे. काही वैद्यकीय उपकरणेही बसवली आहेत. सुमारे ६० गुंठे जागेवर हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. अद्याप या हॉस्पिटलचे उद्घाटन झालेले नाही.
तत्पूर्वीच हे हॉस्पिटल चालवण्यास देण्याचा विषय पुढे आला आहे. वार्षिक सुमारे सात ते आठ कोटींचा खर्च येत असल्याने ते चालवण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे. मात्र हे हॉस्पिटल महापालिकेने स्वत: चालवावे, भाडे कराराने खासगी संस्था, व्यक्तीस चालवण्यास देवू नये, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी केली आहे. काही पदाधिकारी, नगरसेवकांनीही प्रशासनाच्या या प्रस्तावाला विरोध केला आहे. महासभेत आता काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
राजवाडा चौकातील महापालिकेच्या संत दासराम केळकर महाराज व्यापारी संकुलातील तीन गाळे राजारामबापू सहकारी बँकेस महापालिकेने भाडेतत्त्वावर दिले आहेत. या संकुलातील काही गाळे यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित भाडेकरूंना विक्री केलेले आहेत. राजारामबापू बँकेनेही हे गाळे खरेदीने मिळावेत, अशी मागणी केलेली आहे. त्यानुसार पालिकेने या तीन गाळ्यांचे १०९.८० चौ.मी. क्षेत्रासाठी १ कोटी २६ लाख ४९ हजार ८४० रुपये मूल्यांकन केले आहे.