सांगली : घरपट्टीप्रश्नी लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवार, दि. १० रोजी गणेशनगरातील रोटरी सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता जनसुनावणी घेण्यात येणार आहे. हरकतदार मालमत्ताधारकांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी द्याव्यात, असे आवाहन वाढीव घरपट्टीविरोधी कृती समितीच्यावतीने करण्यात आले. येथील विवेकानंद ज्येष्ठ नागरिक सभागृहात गुरुवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे म्हणाले, ''घरपट्टी मनमानी पध्दतीने रेटण्याचा प्रयत्न होतोय. लोकांनी जागृत होऊन यातील त्रुटीविरोधात शक्य त्या मार्गाने आवाज उठवला पाहिजे.'' माजी सभापती हणमंत पवार म्हणाले, ''भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी ही परवडणारी आणि न्याय्य हवी. त्यासाठी न्यायालयात जाऊन या प्रक्रियेत न्यायालयाने हस्तक्षेप करून महापालिकेला मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी आपली भूमिका असेल. कायदा वाऱ्यावर सोडून प्रशासन निष्ठूरपणे प्रक्रिया पुढे नेत आहे. त्यासाठी पुढील आठवडाभरातच आपल्याला न्यायालयात जावे लागेल.''
नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले,''सरसकट विरोधाची भूमिका न घेता घरपट्टी न वाढवता महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे, अशा सूचना आपण केल्या पाहिजेत. दिलेल्या नोटीसा समजून घेणे आणि चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती घ्याव्यात.''
रवींद्र वळवडे म्हणाले, ''महापालिका दरवर्षी मागणीच्या निम्मी घरपट्टीही वसूल करीत नाही. थकबाकीदार वर्षानुवर्षे करच भरत नाहीत. उपयोगकर्ता कर, भारांक, इमारतींचा वापर प्रकार, व्यावसायिक वापर याविषयी अनेक त्रुटी आहेत. त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला पाहिजे.''
ग्राहक पंचायतीचे ज्ञानचंद्र पाटील म्हणाले, ''हरकती कशा घ्याव्यात याविषयी कायदेशीर मार्गदर्शन समितीच्यावतीने केले जात आहे. त्याचा नमुना जनसुनावणीदिवशी सर्वांना दिला जाईल.'' यावेळी कुलदीप देवकुळे, प्रेमचंद पांडे, तोडकर, दामले, रविकांत मिरजकर, मद्वावा व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.