दफनभूमी जागेसाठी मोजले महापालिकेने 25.58 कोटी  Pudhari File pHoto
सांगली

सांगली : दफनभूमी जागेसाठी मोजले महापालिकेने 25.58 कोटी

सहा एकरावर होणार मुस्लिम, ख्रिश्चन दफनभूमी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीकरिता येथील शामरावनगरमधील 6 एकर जागेच्या भू-संपादनासाठी महापालिकेने 25.58 कोटी रुपये मोजले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार महापालिकेने 28 मार्चरोजी 18.32 कोटी रुपये भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केले. दरम्यान, वर्षभरापूर्वी सुमारे 7.26 कोटी रुपये वर्ग केले होते.

सांगलीत मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी शामरावनगर येथील 6 एकर जागा अधिग्रहण करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या होत्या. या जागेचे भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाकडील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात आली. दरम्यान, जागेच्या किमतीवरून बराच वाद झाला. ही जागा अवाच्या सवा किंमत देऊन खरेदी केली जात असल्याचे आरोप झाले. मुख्यमंत्री यांच्याकडेही तक्रारी झाल्या. चौकशीचे निर्देशही निघाले. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने भूसंपादन प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती आली. भूसंपादनासाठी वाजवी भरपाईचे उर्वरित 18.32 कोटी रुपये तत्काळ वर्ग करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी 28 मार्चरोजी आयुक्तांना दिले. त्यानुसार मार्चच्या अखेरीस ही रक्कम भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. सहा एकर जागेसाठी महापालिकेने भूसंपादन विभागाकडे पहिल्या टप्प्यात 7.26 कोटी रुपये व दुसर्‍या टप्प्यात 25.58 कोटी रुपये, असे एकूण 25.58 कोटी रुपये वर्ग केले आहेत.

या जागेच्या भूसंपादनसाठी प्रस्ताव तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. गेली चार ते पाच वर्षे हा प्रस्ताव प्रलंबित होता. दोन वर्षांपूर्वी या जागेची किंमत निश्चित करून जिल्हाधिकारी कार्यालयाने 30 टक्के रक्कम भरण्यास महापालिकेला सांगितले होते. त्यानुसार पालिकेने त्यावेळी 7 कोटी 26 लाख 13 हजार 718 रुपये जिल्हाधिकारी कार्यालयास वर्ग केले होते. उर्वरित 18 कोटी 32 लाख 46 हजार 166 रुपये मार्चअखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे भूसंपादनासाठी लागणारी शंभर टक्के रक्कम महापालिकेने वर्ग केली आहे. लवकरच या जागेचे भूसंपादन होऊन ती महापालिकेकडे हस्तांतर होणार आहे.

बेथेसदा प्रार्थना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष रेव्ह. अशोक लोंढे म्हणाले, ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी तत्कालीन सांगली नगरपालिकेने 55 वर्षांपूर्वी 20 गुंठे जागा दिली आहे. ती जागा संपून आता 25 वर्षे होऊन गेली. नवीन दफनभूमीची अत्यंत गरज आहे. त्यासाठी अनेक आंदोलने केली. पाठपुरावा केला. अखेर भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने दफनभूमी तत्काळ विकसित करावी.

जागा हस्तांतरानंतर दफनभूमी विकसित : आडसूळ

महापालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ म्हणाले, शामरावनगर येथील सहा एकर जागा दफनभूमीसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उर्वरित प्रक्रिया लवकरच पार पाडून ही जमीन महापालिकेच्या ताब्यात येईल. त्यानंतर तातडीने या जागेवर मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमी महापालिकेमार्फत विकसित करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT