Sangli Municipal Corporation Pudhari Photo
सांगली

Sangli municipal corporation: स्वीकृत नगरसेवक निवडीला मुहूर्त मिळेना

इच्छुकांचा जीव टांगणीला : 8 जागांसाठी मांदियाळी; राजकीय वर्तुळाचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. स्वीकृत नगरसेवकपदाच्या 8 जागांसाठी इच्छुकांची मांदियाळी आहे. प्रामुख्याने भाजपमध्ये इच्छुकांची असलेली मोठी संख्या आणि नेत्यांमधील गटबाजी यामुळे या निवडी रखडल्याची चर्चा जोरात आहे.

महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ 39 आहे. काँग्रेस 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 आणि शिवसेना 2 असे पक्षीय बलाबल आहे. महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांचा कोटा निश्चित झालेला आहे. महापालिकेत एकूण 8 स्वीकृत नगरसेवक असतील. भाजपचे 4, काँग्रेसचे 2 व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक असतील.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात इच्छुकांची मोठी संख्या आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेकांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा शब्द नेत्यांनी दिलेला आहे. आता त्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल दि. 16 जानेवारी रोजी लागला. महापौर, उपमहापौर निवड दि. 10 फेब्रुवारी रोजी झाली. आता एप्रिल महिन्याचा महिला आठवडा होत आला तरी अद्याप स्विकृत नगरसेवक निवडणुकीला मुहूर्त लाभला नाही. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे स्वीकृत नगरसेवक निवडी लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी दिली, पण पराभूत झाले, त्यांना स्वीकृत नगरसेवक करायचे नाही, असा निर्णय भाजपने यापूर्वीच केलेला आहे.

मात्र काही पराभूत उमेदवारांकडूनही स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग सुरू आहे. एकूणच स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर पडल्याने इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील इच्छुकांच्याही नजरा स्विकृत नगरसेवक निवडीकडे लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT