सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : बडतर्फ अभियंत्याला पुन्हा नोकरीत घेण्याच्या हालचाली

महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह : पैशाच्या ऑफरवर भडकले होते तत्कालीन आयुक्त

पुढारी वृत्तसेवा

सांगली : नगररचना विभागातील एका बडतर्फ शाखा अभियंत्याला पुन्हा महापालिकेच्या नोकरीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या शाखा अभियंत्याने तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांना चक्क पैशाची ऑफर दिली होती. त्यावरून गांधी भलतेच भडकले होते. गांधी यांनी त्याला तातडीने सेवेतून कार्यमुक्त केले होते. त्याला आता पुन्हा सेवेत घेण्यासाठी काही मंडळींनी फिल्डिंग लावली आहे. महापालिकेत त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

तत्कालीन आयुक्त गांधी यांनी कुपवाड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना कार्यालयात नागरिकांची गर्दी दिसली. नगररचना विभागात बऱ्याच दिवसांपासून पाठपुरावा करूनही कामे होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. आयुक्त गांधी यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित शाखा अभियंत्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. हालचाल रजिस्टरमध्ये नोंद न करता तसेच वरिष्ठांची परवानगी न घेता कार्यालय सोडणे, कर्तव्यात कसूर, असा ठपका ठेवत त्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर मानधन तत्त्वावर नियुक्त संबंधित शाखा अभियंत्याने खुलासा सादर केला होता. मात्र तो अमान्य करून त्यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. या दरम्यानच्या कालावधीत संबंधित शाखा अभियंत्याने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना थेट पैशाची ऑफर दिली. त्यावर आयुक्त गांधी संबंधित शाखा अभियंत्यावर भलतेच भडकले होते. त्यांनी संबंधित शाखा अभियंत्याला बडतर्फ करून आपला कडक पवित्रा स्पष्ट केला होता.

ठराव विखंडित होणार का..!

संबंधित शाखा अभियंत्याला पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव झाल्याचे समजते. विद्यमान आयुक्त संजीता महापात्र यांनी संबंधित ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाला पाठवावा, अन्यथा बेशिस्त, बेजबाबदार कारभाराचा बोजवारा उडेल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT